डोंबिवली पूर्व भागात वास्तव्यास असलेले अमोल (नाव बदलले आहे) नोकरी करतात. एप्रिलमध्ये त्यांना अर्धवेळ नोकरीविषयी मेसेज आल्यानंतर त्यांनी या नोकरीमध्ये रस दाखवला. नंतर व्हॉट्सअॅपवर तीन इन्स्टाग्राम खात्याच्या लिंक आल्या. या तिन्ही खात्याला फॉलो केल्यानंतर त्यांच्या खात्यावर एकूण ३०० रुपये जमा झाले. मात्र, पुढचा टास्क हा पैसे भरण्याचा असल्याने अमोल यांनी ऑनलाइनद्वारे तीन हजार रुपये पाठवले. आणखीन एक टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना जेवढी तुम्ही रक्कम भराल, त्या रकमेवर ३० टक्के अधिक रक्कम दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच, संबधित टेलिग्राम धारकाने त्यांना क्रिप्टो करन्सीबाबत ट्रेडिंग करण्यास सांगितले. आरोपींच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत अमोल यांनी सुरुवातील तीन हजार रुपये भरले. तर, त्यांना ४ हजार २० रुपये मिळाले. आणखीन त्यांनी ७ हजार रुपये भरले. मात्र, आरोपींनी त्यांना टास्कमध्ये काहीतरी चूक झाली आहे. पुन्हा पैसे भरण्याविषयी सांगितल्याने अमोल पैसे भरत गेले. एकूण ३१ लाख ८८ हजार ७१९ रुपये त्यांनी ऑनलाइनद्वारे पाठवले. मात्र, या रकमेवर त्यांना एक रुपयादेखील मिळाला नाही. आणखी पैसे भरण्यासाठी त्यांच्याकडे आता काहीच पैसे शिल्लक राहिले नाहीत. लाखो रुपये उकळल्यानंतरही आरोपींकडून पैशाची मागणी थांबली नाही.
पैसे न भरल्यास आजपर्यंत भरलेली रक्कम परत मिळणार नाही, अशी धमकीदेखील आरोपींनी अमोल यांना दिली असून या फसवणुकीप्रकरणी अमोल यांच्या तक्रारीनंतर दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अमोल पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर अशाप्रकारे डोंबिवलीतील एका व्यक्तीसह इतरही लोकांची फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. लोकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.