राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा म्हणून निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे प्रथमच मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये आल्या असताना, त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करून स्वागत केले. त्यानंतर खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील विधान केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. मी अजूनही लोकशाहीत जगत आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी टीका करणाऱ्या खासदारांना दिले आहे. पक्षातील कामाचे विभाजन हे स्पष्ट असून, माझा मतदारसंघ महाराष्ट्रात असल्यामुळे या राज्यातील संघटनेची जबाबदारी माझ्यावर आली आहे. सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर नसून, टीमवर्क म्हणून आम्ही देशात काम करीत आहोत. लोकसभेच्या तयारीला राष्ट्रवादीने कधीच सुरुवात केली असून, अनेक बैठकी झाल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीत या चर्चा घेतल्या जातील, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.
‘अजित पवार आमच्या सरकारमध्ये यावेत’
‘विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात तेव्हा लोक त्यांना गांभीर्याने घेतात, संजय राऊत यांच्या बोलण्याकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. सामाजिक ऐक्य राखण्यात अजित पवार आघाडीवर असतात. त्यांच्यासोबत काय राजकारण घडते, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे अजित पवार आमच्या सरकारमध्ये यावेत, अशी आमची इच्छा आहे,’ असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर शुक्रवारी स्पष्ट केले.
‘अजित पवार यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. ते विरोधी पक्षाचे जबाबदार नेते आहेत. संजय राऊत यांच्यासारखे लोक रोज बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण, अजित पवार बोलतात, तेव्हा लोक त्यांना गांभीर्याने घेतात. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये अजित पवार आमच्यासोबत आघाडीवर असतात. त्यांनी सरकारमध्ये यावे, अशी आमची अपेक्षा आहे,’ असे ते म्हणाले.
हे जाहिरातीचे सरकार
अमळनेर : ‘राज्यातील सरकारमध्ये तुझ्यापेक्षा मी मोठा ही जणू काही स्पर्धा सुरू झाली आहे. सत्तेसाठी काहीही करणारे हे जाहिरातीचे सरकार आहे,’ अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. अमळनेर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘सध्याचे सरकार केवळ प्रशासनातील अधिकाऱ्यांची बदल्या करीत आहे. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना याचा फटका बसला आहे. सध्या बेरोजगारी आणि महागाईने नागरिक त्रस्त आहेत. अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. कांदा व कापूस उत्पादकांची घोर निराशा झाली आहे, असे पवार म्हणाले. भारताची लोकसंख्या वाढत आहे, त्या संदर्भात विधेयक आल्यास त्याला माझे वैयक्तिक समर्थन राहील. सर्व राजकीय पक्षांनी दोनच अपत्ये हवीत, असा कायदा आणला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.