म. टा. प्रतिनिधी, राजगुरुनगर : शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार येथील येथील केटीईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला. या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात शाळेकडे विचारणा केल्यानंतर शाळेने सर्वांना वर्गात बसण्याची परवानगी दिली.उन्हाळ्याच्या सुटीनंतर गुरुवारी शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी सगळीकडे शाळेकडून बँड, फुले, वह्या-पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. मात्र, केटीईएस शाळेत शुल्क न भरल्याने काही मुलांना वर्गाबाहेर काढण्यात आले. या शाळेत सुमारे सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर शुल्क भरलेले आणि न भरलेले अशी वर्गवारी करण्यात आली. शुल्क भरणाऱ्यांना वर्गात बसू दिले. शुल्क न भरलेल्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. बाहेर काढलेली काही मुले घरी गेली, तर काही शाळेच्या व्हरांड्यात बसून राहिली. या प्रकारामुळे मुलांना धक्का बसला. हा प्रकार मनसेचे सोपान डुंबरे, नितीन ताठे यांना समजल्यानंतर त्यांनी पत्रकारांना बोलावून हा प्रकार सांगितला. वादावादीनंतर शाळेने सर्वांना वर्गात बसण्याची परवानगी दिली. मात्र, घडल्या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
फर्स्ट डे ठरला वर्स्ट डे! शाळेच्या पहिल्या दिवशीच चिमुकले ५ तास रस्त्यावर, नाशिकमधील प्रकार
माझी दोन मुले शाळेत आहेत. दोघांची एकूण फी ४४ हजार रुपये मी एकदम भरू शकत नाही. ती दोन टप्प्यांत भरण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती मी संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर व मुख्यध्यापकांना केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मुलांचा शाळेचा पहिलाच दिवस नाराजीचा गेला.- रूपेश कहाणे, पालकप्रवेशानंतर पालक फी भरत नाहीत. त्यामुळे संस्थेने प्रवेशापूर्वी फी भरण्याचा नियम केला आहे. पालकांना तसे मेसेज पाठवून १३ जूनपूर्वी फी भरल्यासच प्रवेश दिला जाईल, असे कळवले होते. मात्र, त्यानंतरही काही पालकांनी फी न भरल्याने त्यांच्या मुलांना प्रवेश दिला नाही. या संदर्भात पालकांशी बोलून मार्ग काढू.- डॉ. प्रदीप शेवाळे, संचालक व इंग्रजी माध्यम शाळाप्रमुख