• Sun. Sep 22nd, 2024
Msrtc ने दिली गुड न्यूज! लाखो प्रवाशांची ST बस तिकीट आरक्षणाची कटकट कायमची दूर होणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘पैसे वजा होऊनही एसटी तिकीट न मिळणे’, अशी अडचण लाखो प्रवाशांना एसटी महामंडळाच्या अधिकृत मोबाइल अ‍ॅप आणि अधिकृत वेबसाइटवरून तिकीट आरक्षण करताना येते. ती आता कायमस्वरूपी दूर होणार आहे. प्रवाशांना एसटी तिकिटांचे आरक्षण सहज करता यावे, यासाठी प्रवासी सुविधा अ‍ॅप तयार करण्यात येत असून, ऑगस्टपासून हे अ‍ॅप प्रवाशांना वापरता येणार आहे.’महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘मटा कट्टा’ उपक्रमात महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने गुरुवारी सहभागी झाले होते. अवघ्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात नव्या गाड्यांचा समावेश होत असतानाच प्रवासीपुरक तंत्रज्ञानावरही महामंडळाचा भर असणार आहे, अशी ग्वाही शेखर चन्ने यांनी यावेळी दिली. एसटी प्रवाशांना गाड्यांचे आरक्षण सहज, सुलभ आणि विनाअडथळा करता यावे, यासाठी एसटी महामंडळाने इबिस-कॅश कंपनीशी पाच वर्षांसाठी करार केला आहे. करारानुसार एसटी अधिकृत मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाइट विकसित करण्यात येणार आहे. चुकीचा आसनक्रमांक येणे, आरक्षणासाठी गाडीच उपलब्ध नसणे, तिकीट आरक्षित न होता पैसे वजा होणे आणि त्याचा परतावा मिळवण्यासाठी हेलपाटे मारणे या आणि अशा अनेक त्रुटी सध्या वापरात असलेल्या आरक्षण प्रणालीमध्ये आहेत. त्याचबरोबर तिकीट आरक्षण करताना अधिकृत वेबसाइट बंद पडण्याच्या समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. ‘आधुनिक आरक्षण प्रणालीमुळे एसटीच्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवरून आगाऊ आरक्षण करीत असताना प्रवाशांना अडचणी येणार नाहीत’, असा विश्वास शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे. (सविस्तर मुलाखत मटा रविवारच्या अंकात.)

एसटी महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; डेपोत होणार मिनी थिएटर, काँक्रिटीकरणासाठी देणार ५०० कोटी
ऑनलाइन व्यवहाराची सुविधा

तिकिटासाठीच्या अ‍ॅपवर गुगल पे, पेटीएम आणि अन्य मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमाने पैसे भरण्याची सुविधा असेल. यामुळे ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा मिळावी, ही प्रवाशांची मागणी पूर्ण होणार आहे. सध्या रोख आणि क्रेडिट-डेबिट कार्डने पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रवासी सुविधा अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर प्रवाशांना आरक्षित आसनक्रमांक, गाडीची माहिती त्याचबरोबर गाडी कुठे आहे याची माहिती देखील अॅपवरच उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रवासी माहिती यंत्रणेची जोडणी देण्याचे काम सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज तर बसस्थानकं चकाचक करणार; ५०० कोटींची घोषणा
११ हजार गाड्यांमध्ये देखरेख प्रणाली

एसटीच्या गाड्यांमध्ये ‘वाहन देखरेख प्रणाली’ कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याची जोडणी ‘प्रवासी माहिती सुविधे’ला (पीआयएस) असणार आहे. सध्या ११ हजार एसटी गाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे. लवकरच प्रवाशांना आपल्या मोबाइलमध्ये गाडीचा ठावठिकाणी समजणे शक्य होईल’, असे चन्ने यांनी सांगितले.

मुलुंड एलबीएस रोडवर भलं मोठं झाड कोसळलं; मार्ग मोकळा होईपर्यंत वाहनधारकांचा खोळंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed