एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आता राज्यातील एसटी बस स्थानकांमधील काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. हे काँक्रिटीकरण पूर्ण करून बसपोर्ट ही संकल्पना राबवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
ग्रामीण भागांमध्ये थिएटर उपलब्ध नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सिनेमे पाहता येत नाहीत. हे लक्षात घेत जर एसटी बस स्थानकांमध्ये मिनी थिएटर उभारली गेली तर लोकांना सिनेमे पाहण्याची संधी उपलब्ध होईल. यासाठी पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एसटी बस आगारांमध्ये आणि बस स्थानकांमध्ये प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. एसटी तोट्यात जाता कामा नये, ती नेहमीच नफ्यात असली पाहिजे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. आपल्या राज्यात एसटीची अनेक मोठी बसस्थानके आहेत. त्यांचा विकास केला तर एसटीचा मोठा फायदा होईल. हा विकास सरकारी आणि खासगी भागिदारीतून करता येऊ शकतो, असेही ते पुढे म्हणाले. हा विकास एलअॅण्डटी, रिलायन्स, टाटा यांसारख्या मोठ्या आणि अनुभवी उद्योगसमूहांकडून करून घेतला पाहिजे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्र्यांकडे
जसा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो, तसाच तो एसटी कर्मचाऱ्यांना मिळायला हवा, अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
परदेशी शिक्षणासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना १० लाख रुपये देणार
एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुले जर परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी एसटी महामंडळातर्फे बिनव्याजी १० लाख रुपये अग्रीम देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. या बरोबरच एसटीचे चालक आणि वाहकांची आरोग्य तपासणी देखील मोफत केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.