राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष – खासदार शरद पवार हे दि. 16 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर/ कार्यशाळेचे शरद पवार यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे, यावेळी शरद पवार हे एक दिवसीय शिबीरास मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी गुरुवारी शरद पवार हे मुंबई येथून रेल्वेत गाडीत बसले. या दरम्यान शरद पवार ज्या डब्यात होते, त्या डब्यात शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा दिसून आले. गुलाबराव पाटील व शरद पवार एकाच डब्यातून प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पहायला मिळाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा झाल्याचे कळते. दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासात दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली की नाही? याबाबत मात्र नेमकं कळू शकले नाही.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री तसेच आमदारांकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेल्यानेच अनेक जण उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडल्याचं शिंदे गटातील आमदारांनी भाषणांमधून ठिकठिकाणी जाहीरपणे सांगितल आहे. ज्या पक्षावर सातत्याने टीका करतात, त्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे दिसून आल्याने वेगवेगळ्या चर्चां रंगू लागल्या आहेत.