नागपूर ग्रामीण अर्थात रामटेक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी-नेत्यांनी हा मतदारसंघ पक्षासाठी कसा अनुकूल आहे, हे पटवून देण्याचा जोरदार प्रयत्न केला. शिवसेना ठाकरे गटाकडे असणाऱ्या मतदारसंघात त्यांच्यापेक्षा अधिक पक्ष भक्कम असल्याचा दावा नेत्यांनी केला. काँग्रेसकडून युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी या मतदारसंघासाठी दावा केला आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली, तर ठाकरे पक्षाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे.
खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाले. ठाकरे गटाकडे उमेदवार नाही. अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघ भक्कम केला आहे. तितकेच बळ हिंगणा विधानसभा मतदारसंघात आहेत. रमेश बंग यांचा आजही प्रभाव आहे. काँग्रेसचे सावनेरमध्ये सुनील केदार व उमरेडमध्ये राजू पारवे हे दोन आमदार आहेत. रामटेकचे आमदारही शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. कामठीतही आघाडीची बाजू भक्कम आहे. अशा स्थितीत हा मतदारसंघ पक्षाला मिळाल्यास विजय खेचून आणू, असा दावा जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी व्यक्त केला. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार प्रकाश गजभिये, अविनाश गोतमारे, किशोर बेलसरे यांनीही मतदारसंघासाठी आग्रही भूमिका घेतली.
बैठकीला प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे, ईश्वर बाळबुधे, सलिल देशमुख, सतीश शिंदे यांच्यासह सुमारे ३५ पदाधिकारी उपस्थित होते.
तीन दावेदार
प्रकाश गजभिये, राजाभाऊ टांकसाळे आणि रमेश फुले यांनी तर थेट उमेदवारीच मागितली. पक्षाने कुणालाही उमेदवारी दिली तर, त्यास निवडून आणण्याचे प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्ह्यातील नेत्यांनी दिली.