श्रीगोंदा विधानसभआ मतदारसंघातून घनश्याम शेलार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना तगडी फाईट दिली. केवळ ७५० मतांनी घनश्याम शेलार यांचा पराभव झाला. परंतु माजी आमदार राहुल जगताप पुन्हा पक्षात सक्रीय झाल्याने शेलार यांच्या मनात अस्वस्थता होती. त्याच भावनेतून त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याची चर्चा आहे.
घनश्याम शेलार यांची ओळख
घनश्याम शेलार सुरवातीला पत्रकार, छायाचित्रकार होते. युवा मोर्चाच्या माध्यमातून ते पुढे भाजपमध्ये आले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले. त्यांच्या काळात नगरला राष्ट्रवादी काँग्रेसचे भव्य राष्ट्रवादी भवन ऑफिस झाले. पुढे उमेदवारी देण्यावरून खटकले आणि त्यांना पक्ष सोडला.
नंतर शिवसेना, वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करून ते पुन्हा राष्ट्रवादीत आले. मागीलवेळी माजी आमदार राहुल जगताप यांनी विधानसभा लढण्यास नकार दिल्याने शेलार यांना उमेदवारी दिली गेली. त्यांचा बबनराव पाचपुते यांनी थोडक्यात पराभव केला. त्यानंतर यावेळीही ते इच्छुक होते. मात्र मधल्या काळात विविध माध्यमांतून पुन्हा राहुल जगताप यांची ताकद वाढत गेली. पक्षही त्यांना अनुकूल आहे. त्यामुळे शेलार यांना असुरक्षित वाटत असावे त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलून बीआरएसची वाट धरली.
विशेष म्हणजे पक्ष बदलचा असाच रेकॉर्ड भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या नावावर आहे. त्यांनीही दरवेळी वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविली आहे. आता त्याच श्रीगोंद्यात शेलार यांनीही असाच रेकॉर्ड केला.
उद्या पत्रकार परिषद घेणार
शेलार हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जात. आपण राष्ट्रवादी का सोडली, या नव्या पक्षात प्रवेश का केला, याची भूमिका उद्या गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचे ते म्हणाले.