पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रात जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून मुले समुद्रकिनारी जात आहेत. सोमवारी बिपर्जयमुळे समुद्रात भरती असताना सांताक्रूझ, वाकोला परिसरातील सहा मुले पाण्यात उतरली होती. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले होते. अग्निशमन दल, नौदल, तटरक्षक दल मुलांचा शोध घेत होती. सोमवारी रात्री अंधारामुळे थांबविण्यात आलेली शोधमोहीम मंगळवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली. मंगळवारपर्यंत चार मुलांचे मृतदेह हाती लागले होते.
दत्त मंदिर रोडवरील वाघरीवाडा वस्तीत ही मुले राहत होती. बहुतांश मुले आठ बाय दहाच्या घरात राहत होती. ते राहत असलेला परिसर दाटीवाटीचा आहे. अद्याप शाळा सुरू झालेल्या नसल्याने ही मुले दिवसभर घरीच होती. ही मुले जुहू चौपाटीवर जाणार असल्याचे त्यांच्यापैकी कुणीही आपल्या आईवडिलांना सांगितलेले नव्हते, अशी माहिती धर्मेश फौजिया या मृत मुलाच्या नातेवाईकांनी दिली. ‘जुहू चौपाटीवर मोठी वर्दळ असल्याने तिथे जीवरक्षक तैनात असतात. हे जीवरक्षक आमच्या मुलांना वाचवतील, असे वाटले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते’, असे या नातेवाईकांनी दु:खद अंतःकरणाने सांगितले.
पोलिसांनी हटकले होते.
मुले पाण्यात जाऊ नयेत, म्हणून पोलिसांनी या मुलांना एकदा पिटाळून चौपाटीबाहेर काढले होते. त्यानंतर जुहू कोळीवाड्याच्या वेगवेगळ्या गल्ल्यांमधून फिरत ही मुले पुन्हा समुद्रात गेली, अशी माहिती देण्यात आली आहे.
भावंडांचा मृत्यू
मृतांमध्ये मनीष आणि शुभम ओगनिया या सख्ख्या भावांचा समावेश आहे. या मुलांच्या वडिलांचे निधन झाले आहे. आता या मुलांची आई आणि बहीण ओगनिया परिवारात आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, २२ तासांच्या शोधमोहिमेनंतर तीन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आलं.
मृत मुलांची नावे
जय रोशन ताजभारिया (१६)
मनीष योगेश ओगनिया (१६)
शुभम योगेश ओगनिया (१६)
धर्मेश वालजी फौजिया (१६)
जय रोशन ताजभारिया (१६) हा अद्याप बेपत्ता आहे