• Mon. Nov 25th, 2024

    एकनाथराव जाहिरात देऊन तुम्ही स्वत:चं हसं करुन घेतलंय… अजित पवारांकडून शिंदेंची खिल्ली

    एकनाथराव जाहिरात देऊन तुम्ही स्वत:चं हसं करुन घेतलंय… अजित पवारांकडून शिंदेंची खिल्ली

    मुंबई – ‘शिवसेना आमचीच’ असा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला परंतु बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या वगळला. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच शिवसेना पुढे घेऊन चाललो आहे आणि उध्दव ठाकरे यांनी त्या विचारांपासून फारकत घेतली असे तुम्ही जनतेला सांगता मात्र यांनीच राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न पध्दतशीरपणे बाजूला ठेवले आहेत, असा थेट हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.

    जवळपास अनेक वर्ष सरकारमध्ये किंवा सरकारच्या बाहेर राहून खासदार आणि आमदार म्हणून ३२ वर्ष काम करतोय. सकाळी पेपर उघडले तर पहिल्या पानावर जाहिरात पहायला मिळाली मात्र अशी जाहिरात कधी पाहिली नाही असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.

    बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो का नाही?

    शिंदे गटाची ही जाहिरात असून त्या गटाचे लोक इतक्या लवकर बाळासाहेब ठाकरे यांना कसे विसरले अशी शंका उपस्थित करतानाच बाळासाहेबांच्या विचारांचे, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहात म्हणून शिवसेना खेचून घेतली मग जाहिरातीमध्ये हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो का नाहीत असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

    भाजप नेत्यांना मेसेज, शिंदेंची आता फडणवीसांशी स्पर्धा; रोहित पवारांनी सांगितला त्या जाहिरातीमागे दडलेला अर्थ
    या जाहिरातीमध्ये स्वतःच ठरवून सर्वेक्षण केलेले आहे. नेमके कुठे सर्वेक्षण केले, कुणी सांगितले, कुणाला किती टक्के, याचा थांगपत्ता नाही. एक्झिट पोल येतात ते कुणी केले ते सांगतात. मध्यंतरी सकाळने एक सर्व्हे केला. तो सर्व्हे आम्ही केला असे त्यांनी सांगितले. मात्र तसा हा सर्व्हे छापून राज्याच्या प्रमुखाने एक विश्वविक्रम केला आहे, असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.

    एवढेच लोकप्रिय आहात, तर निवडणूक का घेत नाही?

    या जाहिरातबाजीने शिंदे यांनी उलट स्वतः चे हसे करून घेतले आहे. तुम्ही जर इतके लोकप्रिय आहात तर मग उद्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा आणि जनतेच्या मैदानावर या. जनतेच्या मैदानावर जनता कुणाच्या पाठीशी किती आहे मविआच्या पाठीशी किती आहे, शिंदे गटाच्या व भाजपच्या पाठीशी किती आहे हे चित्र स्पष्ट पणे पहायला मिळेल असे जाहीर आव्हानही अजित पवार यांनी दिले.

    जाहिरात आपण केलेले काम लोकांपर्यंत पोचावे किंवा जाहिरातीवर मोठा खर्च वेगवेगळ्या एजन्सी का करतात की, लोकांना माहीत होण्यासाठी, जर यांचे काम एवढे चांगले असेल तर अशा पध्दतीच्या पानभर जाहिराती आणि तीपण जाहिरात करत असताना त्या जाहिरातीमध्ये जो सर्व्हे दाखवला आहे त्यात एक नंबर एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री पदाकरिता लोकांनी कौल दिला आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पुढे व्हावेत असे वाटायला लागले आहे याबद्दल आनंद वाटला असेही अजित पवार म्हणाले.

    इतक्या लोकांचा पाठिंबा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही. पंधरा दिवसाने एक वर्ष पूर्ण होईल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक घ्या सांगत आहोत. तरी निवडणूका घेत नाही. यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते आहे असा हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.

    सरकारमधील महत्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा

    त्या जाहिरातीमध्ये राज्याच्या विकासाचे सांगितले असते, इतकी बेरोजगारी कमी केली, जीडीपी वाढला आहे तो कमी केला, शेतकर्‍यांना मदत पोचवली, इतक्या लाभार्थ्यांना या या योजनेत लाभ दिला आहे. हे प्रश्न बाजुलाच राहिले परंतु मी स्वतः कसा लोकप्रिय याचीच स्पर्धा सरकारमधील महत्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांमध्ये चाललेली दिसते असा आरोपही अजित पवार यांनी केला.

    गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशापध्दतीने घोषणा भाजपचे लोक देत होते. आता ती घोषणा मागे पडली असून आता ‘राष्ट्रामध्ये मोदी, राज्यात शिंदे’ ही नवीन घोषणा महाराष्ट्रात आली आहे. ही घोषणा भाजपच्या लोकांना द्यावी लागणार आहे. हे भाजप नेत्यांना मान्य आहे का असा सवालही अजित पवार यांनी भाजपला केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed