म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरूच असून, त्यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले आहे. एसएनसीयू कक्षात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याकडे दरमहा पगारातील एक हजार रुपये देण्याची मागणी केली जात असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला असून, जिल्हा शल्य चिकित्सक यात काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वर्ग चारचे अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. कंत्राटदार संस्थांमार्फत या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. कर्मचाऱ्यांनी याबाबत आवाजही उठविला. परंतु, कामावरून काढून टाकू असे धमकावत कंत्राटदार संस्था कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करीत आहे. यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेतली. संबंधित कंत्राटदाराला विचारणाही करण्यात आली. परंतु, त्यानंतर पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने आता पुन्हा कर्मचाऱ्यांकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. कंत्राटी कर्मचारी रवींद्र थोरात यांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. एसएनसीयू कक्षात १५ कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. दरमहा पगार झाल्यानंतर त्यातील एक हजार रुपये परत करण्याची मागणी केली जात असल्याचा थोरात यांचा आरोप आहे. पैसे दिले नाही तर कामावरून काढून टाकू, असे धमकावण्यात येते. पैसे न दिल्याने दोन महिन्यांपासून पगारही करण्यात आला नसल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला आहे.
Nashik News : धुलाई समिती गोत्यात! प्रथमदर्शनी ६७ लाखांचा घोटाळा उघड, अटी-शर्तींचाही भंग
पैसे जिल्हा शल्य चिकित्सकांसाठी?मूळात आम्हाला कमी पगारात राबवून घेतले जाते. त्यातूनही हजार रुपये कशासाठी मागता? अशी विचारणा कर्मचाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला केली. जिल्हा शल्य चिकित्सकांना हे पैसे द्यावे लागतात, असे कंत्राटदारांकडून सांगितले जात असल्याचा धक्कादायक आरोप रवींद्र थोरात यांनी पत्रातून केला आहे. तक्रारी करूनही कंत्राटदारावर ठोस कारवाई न झाल्याने पिळवणूक वाढू लागल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे.