• Sat. Sep 21st, 2024

भाई का बड्डे! रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं अंगलट, अशी अद्दल घडली की…

भाई का बड्डे! रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं अंगलट, अशी अद्दल घडली की…

बारामती : अलीकडच्या काळात रहदारीच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात नेत्यांचे, दादांचे, भाईंचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच आले आहे. अनेकदा असे वाढदिवस साजरे करत असताना घातक शस्त्रांचा वापर करून वाढदिवस साजरे केले जातात. असे वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवायाही केल्या आहेत. बारामतीतही भर दुपारी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा चौकात वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी शहर पोलिसात बर्थडे बॉयसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेतले आहे.
Virar : इमारतीच्या ४थ्या मजल्यावरून चिमुकली पडली, गॅलरीचे काम सुरू होते, बिल्डरवर गुन्हा दाखल
नागरिकांची मोठी वर्दळ असणाऱ्या शहरातील सातव चौकात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे याचा वाढदिवस साजरा करणे त्याच्या समर्थकांना चांगलेच महागात पडले आहे. येथील सातव चौकात समीर चांदगुडे याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चेल्यांनी केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. चौकात अनेक तरुण जमा झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी चौकात वाढदिवस साजरा करणाऱ्या चांदगुडेसह राहुल राजेंद्र मदने , विकास नानासो चंदनशिवे, अक्षय भीमराव कांबळे (26), सागर रमेश आटोळे यांच्यावर भादवि कलम १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ व क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्याचे इतर समर्थक पोलिसांना पाहताच रस्ता मिळेल तिकडे पळून गेले. ज्याचा वाढदिवस होता तोही पसार झाला.

पुण्यात १०४ वर्षांच्या आजीसह ५१ जणांचा वाढदिवस एकत्रित साजरा, अख्ख्या गावाची हजेरी

नेत्यांचे, भाईंचे, मित्रांच्या वाढदिवसानिमित्त भर रस्त्यात केक कापणाऱ्यांनी यापुढे पोलिसांचे वरील कलमाप्रमाणचे प्रमाणपत्र सुद्धा घेण्यास तयार राहावे. विशेष करून कॉलेजियन्स लोकांनी याबाबत जास्त खबरदारी घ्यावी. एकदा गुन्ह्याचे प्रमाणपत्र भेटले तर त्यांच्या गुणवत्तेच्या इतर प्रमाणपत्राची किंमत झिरो होते. असे आवाहन बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed