• Sat. Sep 21st, 2024
अवैध दारु बंद करा, गावातील महिला मला सोडत नाहीयेत, भाजप आमदाराचा पोलीस अधिकाऱ्याला कॉल

सोलापूर: गावातील नागरिक अवैध हातभट्टी दारू विक्रीला मला जबाबदार धरत आहेत. आपण अवैध दारुविक्रीविरोधात तत्काळ पावलं उचला, अशी विनंतीच दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुखांनी मंद्रुप पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना केली. बोळकोटे गावात महिलांनी मला निवेदन देत दारूबंदी केल्या शिवाय गावातून जायचं नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर आ. सुभाष देशमुखांनी भाषण करताना थेट पोलीस निरीक्षकांनाच कॉल केला. गावातील महिलांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. गावातील महिलांनी अवैध हातभट्टी दारू विक्रीला मला जबाबदार ठरवलं आहे. या आरोपातून मला मुक्त करा व अवैध धंद्यांविरोधात कारवाई करा, अशी विनंती त्यांनी पोलीस निरीक्षकाला केली. राज्यात भाजपची सत्ता असताना व गृहखाते भाजप कडे असताना अवैध धंद्याबाबत पोलिसांकडे भाजप आमदारांना विनंती करण्याची वेळ आली आहे.

भाजप आमदार भूमिपूजन कार्यक्रमासाठी मतदारसंघात गेले होते

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकोटे ते औराद या गावादरम्यान रस्त्याच्या भूमीपूजनाच्या उद्घाटनासाठी भाजप आमदार सुभाष देशमुख शनिवारी सकाळी गेले होते. भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान बोळकोटे गावातील महिलांनी गावात दारूबंदीची मागणी केली. भाजप आमदारांना निवेदन देऊन पोलीस प्रशासनास कारवाईचे आदेश द्या अन्यथा गावातून जाऊ नका, अशी भूमिका संबंधित महिलांनी घेतली. आ. सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमादरम्यान भाषण करताना, माईक हातात घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना कॉल करून गावातील सर्व नागरिकांना दोघांमधला संवाद ऐकवला. गावातील महिलांनी दारू बंदीची मागणी केली आहे. अवैध हातभट्टी दारू बंद करा, त्याशिवाय नागरिक मला जाऊ देत नाहीत, असे आ. सुभाष देशमुखांनी पोलीस निरीक्षकांना सांगितले.

पोलीस निरीक्षक म्हणतात आम्ही कारवाई करतच आहोत

मंद्रुप पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी सुभाष देशमुखांच्या विनंतीला उत्तर देताना म्हटलं, मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकही हातभट्टी दारूचा पॉईंट नाही. अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यावर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. बाहेरून आणलेली हातभट्टी दारू जप्त करून विक्रेत्यांवर कडक कारवाई करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed