राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर होत असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशातच काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असून भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांच्या रुपाने पक्षातील महिला चेहऱ्याला संधी दिली आहे. तसंच गायकवाड यांच्या माध्यमातून शहरातील दलित मतदारांनाही आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
वर्षा गायकवाड यांचा राजकीय प्रवास
वर्षा गायकवाड यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये शालेय शिक्षण विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं आहे. त्या धारावी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर २००४ पासून त्या सलग चार वेळा निवडून आल्या आहेत. प्राध्यापिका म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत.
भाई जगताप यांना धक्का
अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख. भाई जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात झाली. भाई जगताप काँग्रेसच्या तिकिटावर विधान परिषद आमदार आहेत. जगतापांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. ते याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. एप्रिल २०२१ मध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली होती. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु निवडणुका होण्यापूर्वीच आता त्यांची उचलबांगडी झाल्याचे दिसते.