यामुळे समाजात वेगळा संदेश जात आहे, या अत्यंत निंदनीय घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पत्राद्वारे कळवून त्यामध्ये चौकशीची मागणी केली आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अंमलबजावणीवर अधिकाधिक भर देऊन समाजात पोलीस यंत्रणेच्या भरोसा सेल बाबत अजून मोठ्या प्रमाणावर माहिती देण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सूचना केली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी महिलांची सुरक्षितता बाबत शासनाने प्राधान्य देणेबाबत नमूद केले आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अंतर्गत आरोपींवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार गुन्हा नोंद करता येतो. हा प्रकार अत्यंत निर्दयी स्वरूपाचा असल्याने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येऊन विशेष सरकारी वकील नेमण्यात यावेत. या महिलेच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देऊन त्यांना याविषयी शासनाकडून मनोधैर्य योजनेतून मदत देण्याबाबत कार्यवाही व्हावी. या घटनेचा सखोल तपास करून या आरोपी मनोज सानेला कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
पुढे लिहिले की, कौटुंबिक हिंसाचार कायद्याची (भारतीय दंड विधान कलम ४९८ अ) अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्याबाबत यंत्रणेला सूचित करण्यात यावे. याद्वारे अशा प्रकारच्या “महिलांना त्रासदायक होत असलेल्या घटनांपासून संरक्षण मिळू शकते”, याबाबत संबंधित महिला बाल विकास अधिकारी व पोलीस यंत्रणेला तात्काळ अहवाल सादर करण्याबाबत त्यांना आदेशित करण्यात यावे. प्रत्येक जिल्हा आणि शहराच्या स्तरावर असलेल्या पोलिस यंत्रणेच्या भरोसा सेलकडे अशा प्रकारच्या तक्रारींची दखल तात्काळ घेण्याबाबत अधिक सतर्क यंत्रणा असावी यासाठी कार्यवाही व्हावी.
त्याबाबत समाजात अधिकाधिक प्रचार प्रसार करण्यात यावा, यासाठी संबंधितांना सूचित करावे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नयेत यासाठी समाजात अधिकाधिक प्रमाणात या कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात. यासाठी सक्षम स्वरूपात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना यामध्ये सहभागी करून घेण्यात यावे अशा मागण्या डॉ.गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांना केल्या आहेत.