कोल्हापूर शहरापासून केवळ सात किलोमीटरवर असलेल्या कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा येथील वर्दळीच्या मध्यवर्ती चौकात कात्यायनी ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. काल दुपारी दोनच्या सुमारास दुकानावर सराईत टोळीने भरदिवसा दरोडा घातला. सशस्त्र दरोडेखोरांनी सराफी पेढीच्या मालकासह त्यांच्या मेहुण्यावर अंदाधुंद गोळीबार करून दोन कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. यामध्ये तीन किलो सोन्याच्या तयार दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय १ लाख ८० हजारांची रोकडही लंपास केले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत मिळेल तेवढे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर कळेच्या दिशेने पसार झाले. यावेळी पळून जाताना काहींनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या दिशेनेही गोळीबार करण्यात आला.
या गोळीबारात सराफी व्यावसायिक मालक रमेश शंकर माळी (४५) आणि त्यांचे मेहुणे जितू मोड्याजी माळी (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी रमेश माळी आणि जितू माळी यांच्या दिशेने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यात रमेश यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे तर जितू माळी यांच्या कंबरेजवळ गोळी आरपार झाली. दरम्यान दोन्ही जखमींना तत्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून जितू माळी यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना सांगली येथील रिलायन्स ज्वेलरी मॉल मध्ये घडली होती. येथे ही एका टोळीने दरोडा टाकत दहा कोटी पेक्षा अधिक किमतीचे दागिने लुटले होते. या दरोडेखोरांचा अजूनही शोध सुरू असतानाच, कोल्हापुरात घटना घडल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.