• Sat. Sep 21st, 2024

टेम्पो ड्रायव्हर ते सोशल मीडिया स्टार; आरिफचा आरिफ प्रिन्स होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास

टेम्पो ड्रायव्हर ते सोशल मीडिया स्टार; आरिफचा आरिफ प्रिन्स होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास

अहमदनगर: अहमदनगर शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बी.ए. झालेला युवक, कधी टेम्पो चालवून, तर कधी ग्राफिक्स डिजाईनद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आरिफ शेख आपल्या कठोर परिश्रम व अभिनयाच्या जिवावर सोशल मीडियातला प्रिन्स झाला. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशभरात त्याचे मोठ्या संख्येने फॅन असून, बिकट परिस्थितीतून पुढे आलेल्या आरिफला सोशल मीडियात आरिफ प्रिन्स म्हणून आपली छाप उमटवली आहे.

अनेकांचे जीवन रातोरात बदलविणारी सोशल मीडिया आरिफच्या जीवनाला कलाटणी देऊन गेली. आज त्याला मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफर मिळत आहे. देशभरात त्याला विविध कार्यक्रमात सेलिब्रेटी म्हणून बोलविले जात आहे. तो नुकताच इंडोनेशियात एका कार्यक्रमासाठी जाऊन आला आहे.

शहरात टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या आरिफला व्यायामाची आवड लागली. त्याचा मोठा भाऊ देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विविध काम करुन हातभार लावत असे. दिवसभर टेम्पो चालवणे आणि संध्याकाळी जिममध्ये घाम गाळून शरीर कमावणे त्याच्या जीवनाचा नित्यक्रम बनला. त्याचे वडील एका दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांची अचानक तब्येत बिघडली. या दुर्धर आजाराने वडिलांचे निधन झाल्याने त्याचे पितृछत्र हरपल्याने मोठे संकट त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी दोन्ही भावावर आली.

आरिफला टेम्पो चालवून दररोजचे मिळणारे पैसे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कमी पडू लागले. अशा परिस्थितीमध्ये त्याने आपल्या मित्राकडून ग्राफिक्स डिजाईनचे काम शिकून घेतले. टेम्पो चालवून, तर कधी ग्राफिक्स डिजाईनच्या माध्यमातून तो आपला व्यवसाय चालवू लागला. मात्र त्याचे स्वप्न जरा वेगळेच असल्याने तो शांत बसला नाही. जीममध्ये अविरतपणे त्याचा व्यायाम सुरु होता.

पाच ते सहा वर्षापूर्वी विविध कार्यक्रमात बॉडीगार्ड ठेवणे ही नवीन संकल्पना रुजत होती. त्याने पाच वर्ष ग्राफिक्स डिजाईनचे काम केले. एका कार्यक्रमाच्या पत्रिकेची डिजाईन करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने त्याची बॉडी पाहून त्या कार्यक्रमाची त्याला चक्क बॉडीगार्ड बनण्याची ऑफर दिली. पैसे मिळणार म्हणून आरिफने होकार दिला. त्या दिवशी फक्त कार्यक्रमाला हजर राहून मिळालेल्या सातशे रुपयांनी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या कार्यक्रमाचे छायाचित्र आरिफने फेसबुकला टाकले आणि त्या फोटोला हजारो लाईक मिळाले. सोशल मीडियात मिळालेल्या या प्रतिसादाने त्याची आवड त्याकडे अधिक वाढत गेली. तो विविध स्टाईलचे फोटो आपल्या फेसबुक पेजवर अपलोड करु लागला. बघता, बघता हजारो लाईक, कमेंट व फ्रेंड रिक्वेस्ट त्याला येऊ लागल्या.

नव्यानेच टिकटॉकचा ट्रेंड सुरु झाला होता. तो टिकटॉकवर आपले व्हिडिओ टाकू लागला. त्यालादेखील लाखो लाईक येत असल्याने त्याने आपले लक्ष यावर केंद्रीत केले. काही मित्रांना एकत्र करून बाऊन्सर ग्रुप सुरु केला. विविध प्रकारचा कंटेंट घेऊन तो आपल्या मित्रांसह प्रोफेशनल व्हिडिओ बनवू लागला. बघता बघता लाखो लाईक येऊ लागले व त्यातून त्याला काही पैसे देखील मिळू लागले. तर बाऊन्सरचे काम घेण्यासदेखील त्याने सुरुवात केली. मोठमोठ्या कार्यक्रमासाठी त्यांच्या ग्रुपला बाऊन्सर म्हणून बोलवू लागले. अशा कार्यक्रमात आलेल्या आरिफलाच पाहण्यासाठी लोक गर्दी करु लागले. त्याच्यासोबत सेल्फी काढू लागले. सोशल मीडियाने आरिफ प्रसिद्धीच्या झोतात आणले.

टिकटॉकने त्याला ७९ लाख फॉलोअर्स दिले. या दरम्यान सरकारने टिकटॉकवर बंद आणली. सर्व काही संपल्याची भीती त्याला वाटू लागली. आरिफने पुन्हा आरिफ प्रिन्स म्हणून इंस्टाग्रामला नवीन अकाऊंट सुरु केले. तेच जुने फॅन त्याला पुन्हा भेटले. झपाट्याने ३१ लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. भारत देशात नव्हे, तर परदेशातले फॉलोअर्सचे प्रेम त्याला मिळत आहे. आरिफची आई गृहिणी असून, त्याचा मोठा भाऊ आजही रिक्षा चालवतो. ते आजही आपल्या वडिलांच्या छोट्याश्या घरात राहतात. सोशल मीडियात गगनाला गवसणी घालत असताना आरिफचे पाय आजही जमिनीवर आहेत. देशातील विविध राज्यात त्याला कार्यक्रमाला अतिथी म्हणून बोलवले जाते. तर काही दालनाच्या शुभारंभाला एक सेलिब्रिटी म्हणून उपस्थित असतो. त्याचे लाखोच्या घरात फॅन फॉलोअर्स आहे. मात्र शहरात आल्यावर तो आपल्या जुन्या मित्रांसह वेळ घालवत असतो. सोशल मीडियाने सर्व काही मिळवून दिले, तरी अजून पुढील ध्येय बाकी असल्याचे तो सांगतो.

हाजी अली दर्ग्यावर आरिफलला पाहण्यासाठी गर्दी

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात येत असताना आरिफ मुंबईच्या हाजी अली दर्ग्यावर दर्शनास गेला. त्याने दर्गाच्या ठिकाणी पाय ठेवताच सेल्फीसाठी युवक-युवतींच्या रांगा लागल्या. टिकटॉक स्टार आरिफ प्रिंन्स आया हे! ही वार्ता जणू वार्‍यासारखी पसरली आणि मोठ्या गराड्यातून निघणे त्याला कठीण झाले. बरोबर असलेल्या मित्रांनी सर्वांना बाजूला करुन आरिफला त्या गराड्यातून बाहेर काढले. बाहेर काढताना त्याचा शर्टही फाटला. दर्ग्याचे दर्शन न करताच त्याला माघारी फिरावे लागले. यानंतर त्याला आपण कोणीतरी स्टार बनलो असल्याची फिलिंग जाणवू लागली. इथून पुढे तो देखील सार्वजनिक ठिकाणी जाताना दहा वेळा विचार करुन किंवा पहाटे व रात्रीच्या वेळी जात असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed