भिवंडी येथील बागे युसूफ या हायप्रोफाईल सोसायटीत एका लग्नानंतरच्या दावतच (भोजनाचे) आयोजन करण्यात आले होत. या घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र या कार्यक्रमासाठी नालासोपारा येथून आलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या कार्यक्रमात मोहम्मद अक्रम मन्सूरी यांच्या ४ वर्षीय चिमुकलीचा चारचाकी गाडीच्या खाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे भिवंडीत शोककळा परसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.
भिवंडी येथील बागे युसूफ या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये १२ व्या मजल्यावर राहत असलेल्या समसुल्ला मन्सूरी यांच्या मुलाच्या लग्नानंतरच्या दावतचे आयोजन करण्यात आले होते. या दावतसाठी अनेक नातेवाईकांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमाला नालासोपारा येथे राहणारे मोहम्मद अक्रम मन्सूरी हे देखील आपल्या कुटुंबीयांसोबत उपस्थित झाले होते. दावतच्या कार्यक्रमासाठी हॉलवर जाण्याकरीता सगळे नातेवाईक सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खाली जमले होते. तर मुल सोसायटीच्या आवारात खेळत होते. मात्र त्याच वेळी एका चारचाकी (एमएच ४३ एएच २३००) वाहनचालकाने गाडी रिव्हर्स घेतली आणि गाडी मागे उभ्या असलेल्या ४ वर्षांच्या अलिना अक्रम मन्सूरी या चिमुकलीला चिरडले.
अलिना ही बेसावध असताना तिला कारची धडक लागली आणि ती खाली पडून मागच्या चाकाखाली आली. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनीही रिव्हर्स घेणाऱ्या कार चालकाला जोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र गाडीची काच बंद असल्याने त्यांचा आवाज चालकापर्यंत पोहोचू शकला नाही आणि चालकाने गाडी अलीनावर चढवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
या घटनेनंतर इमारतीच्या पार्किंगमध्ये गोंधळ उडाला, घाईघाईत अलिनाला उचलून जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः घटनास्थळी पोहोचले व त्यांनी कसून चौकशी करून मृत मुलीला भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवले. कायदेशीर कारवाई करून मुलीचा मृतदेह तिच्या पालकांनी रात्री उशिरा नालासोपारा येथील तिच्या घरी नेला आणि रात्री बारा वाजेपर्यंत बालिकेचा मृतदेह मुस्लिम रितीरिवाजांनुसार दफन करण्यात आला. सदर प्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून भिवंडी तालुका पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहन चालकाचा शोध सुरु आहे. पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.