• Tue. Nov 26th, 2024
    महापारेषणचा १८ वा वर्धापन दिन

    मुंबई, दि. ७ : महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे, असे प्रतिपादन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले.

    महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    डॉ. संजीव कुमार म्हणाले, देशात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी संधी आहे व आव्हाने आहेत. पाच हजार मेगावॉटपेक्षा जास्त ऊर्जा तयार करण्यासाठी एक हजार सर्किट किलोमीटर अति उच्च दाब पारेषण वाहिनी सुरू करण्याचे धोरण आहे. महापारेषण ही देशात सर्वोत्तम पारेषण कंपनी आहे. महापारेषणने ड्रोनचा वापर सुरू केला आहे. हा ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी चांगला निर्णय ठरला आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभाग स्तरापासून सांघिक कार्यालय स्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू केली आहे. भविष्यातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना चालू राहील, असे त्यांनी सांगितले.

    उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महापारेषणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा संदेश दिला.

    ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.

    महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक, महापारेषणचे संचालक (संचलन) संदीप कलंत्री, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, संचालक (वित्त) अशोक फळणीकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते.

    नसीर कादरी, विश्वास पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुगत गमरे यांनी तर सूत्रसंचालन विनायक शिंदे यांनी केले. तसेच शशांक जेवळीकर यांनी आभार मानले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed