• Tue. Nov 26th, 2024

    जिल्हाधिकारी यांची ‘शासन आपल्या दारी’ शिबिराला भेट

    ByMH LIVE NEWS

    Jun 7, 2023
    जिल्हाधिकारी यांची ‘शासन आपल्या दारी’ शिबिराला भेट

    आकपुरी, लोणबेहळ, मुडाना, विडुळ गावातील शिबिराला भेट; नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप

    यवतमाळ, दि ७ जून जिमाका:- नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावे,तसेच दैनंदिन कामासाठी लागणारे महत्वाचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा  तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेले विविध दाखले गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने “शासन आपल्या दारी” हा उपक्रम सुरू केला आहे. शासन आपल्या दारी शिबिराच्या माध्यमातुन नागरिकांनी जीवन सुकर करण्यासाठी आवश्यक योजनांसाठी नोंदणी करावी तसेच दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

    “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत आज यवतमाळ तालुक्यातील आकपुरी, आर्णी तालुक्यातील लोणबेहळ,  कवठा बाजार सुकळी, महागाव तालुक्यातील मुडाणा, भोसा  गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ तालुक्यातील आकपुरी येथील शिबिराला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तहसिलदार योगेश देशमुख उपस्थित होते.

    यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गावातील नागरिकांना अगदी छोट्या कारणांसाठी तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि त्यांना गावातच आवश्यक सेवा देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. या शिबिराच्या माध्यमातुन नागरिकांचा त्रास कमी होईल. शिवाय जनतेच्या अडचणी, तक्रारी तालुकास्तरीय अधिका-यांना समजुन घेता येतील.

    शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे घेताना बियाणे खरेदीची पावती अवश्य घ्यावी व ती सांभाळून ठेवावी.  एखाद्या वेळी बियाणे खराब निघाल्यास किंवा उगवले नाही तर या पावतीच्या आधारे शेतक-यांना कंपनीकडे नुकसान भरपाई मागता येते.  घरकुलसाठी लाभार्थ्यांना ९ जुनपर्यंत रेती घाटातुन मोफत ५ ब्रास रेती नेता येते.  मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री, पालक नसलेल्या मुलांसाठी बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. नागरिकांनी यासाठी अर्ज करावा.  यासोबतच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी  दाखले, प्रमाणपत्र आवश्यक असतात.  या शिबिरात दाखल्यासाठी अर्ज व कागदपत्रे सादर केल्यास सात दिवसाच्या आत आपल्याला प्रमाणपत्र व  दाखले उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकरी बचत गटासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, पीएम किसान, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या योजनांचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध योजनांचे निवड प्रमाणपत्र, तसेच दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

    शिबिरात विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यात महसुल, पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, एस टी महामंडळ, महावितरण, बँक, वनविभाग, आधार, पुरवठा विभाग इत्यादी विभागांचा समावेश होता.

    आज या गावात शासन आपल्या दारी

    यवतमाळ तालुक्यात आकपूरी, सावरगड, कापरा या तीन गावात शिबिर घेण्यात आले. यात एकुण १४२६ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच आर्णी तालुक्यात लोणबेहळ, कवठा बाजार, सुकळी या गावात एकुण ३१८६ दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तर महागाव तालुक्यात मुडाणा,गुंज आणि सवना गावात एकुण ९३१ प्रमाणपत्रे वाटप केलीत. तर  उमरखेड तालुक्यात विडुळ,ब्राम्हणगाव आणि चातारी या गावात एकुण ६६५ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.  शिबिरात नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

    ०००००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed