• Mon. Nov 25th, 2024
    Kolhapur News: कोल्हापुरात स्थिती चिघळली; आक्रमक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, औरंगजेबावरील पोस्टमुळे रणकंदन

    कोल्हापूर : औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली आहे. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असून आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.

    कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दुपारी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारात जमा झाले. तिथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर जमाव शहरातील टाऊन हॉल, बिंदू चौक व इतर काही भागांत गेला. तिथे त्यांनी हातगाड्या व इतर काही वाहने, दुकानांची तोडफोड केली. यामुळे शहरात तणाव वाढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मोठी कुमक बोलाविण्यात आली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमारही केला. सायंकाळपर्यंत शहरात तणावाची परिस्थिती कायम होती.

    शाहू महाराज, मालोजीराजेंच्या उपस्थितीत कोल्हापुरच्या नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक

    Satara News: मुंबईतील तरुण गावी गेला, कोयना धरणातील बॅकवॉटरमध्ये उतरला, मित्रांदेखत गाळात रुतत गेला अन्…

    दरम्यान, संबंधित समाजकंटकांवर कारवाई व्हावी; तसेच अशा प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळी दहा वाजता सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येऊन ‘बंद’चे आवाहन करण्याचे निश्चित केले. बुधवारी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

    पोलिसांकडून बंदी आदेश जारी

    हिंदुत्ववादी संघटनानी आज कोल्हापूर बंदची हाक दिल्याने काल रात्रीपासूनच कोल्हापूरात चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने सर्व हिंदुत्ववादी संघटनांना बंद मागे घेण्याचे आवाहन केलं होतं. स्टेटस ठेवणारे तसेच बेकायदेशीर जमाव जमवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे. बंदची हाक दिल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि हिंदुत्ववादी संघटनांची बैठक पार पडली असून यामध्ये कोल्हापूर बंदचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती पोलिसांनी केली होती. मात्र हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम राहिल्याने पोलिसांनी रात्री उशिरा कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदी आदेश जारी केले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed