म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळीवाऱ्याच्या फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बिघाडामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा तब्बल १३ तास बंद पडली, त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून, पालिकेने पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला आहे.शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न कमी व्हायला तयार नाही. कधी एअर व्हॉल्व्ह फुटल्यामुळे; तर कधी जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळित होत आहे. पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याचा देखील शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यातच आता वादळी वाऱ्याने भर टाकली आहे. शहर व जिल्ह्यात रविवारी वादळीवारा आला. त्यामुळे जायकवाडी पंपहाऊसच्या परिसरातील झाडाची फांदी विजेच्या तारावर पडली आणि पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित झाला. फारोळा आणि ढोकरीन येथील वीजपुरवठाही वादळी वाऱ्यामुळे बंद झाला.
Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे भाव झाले अपडेट, दर वाढले की घटले? लगेच चेक करा
रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारात तिन्हीही ठिकाणचा वीस पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आला. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी या सर्व घटनेला दुजोरा दिली.‘सायंकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत पाणी पुरवठ्याची यंत्रणा ठप्प राहिल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. शक्य तेवढ्या भागात वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, पण बहुतांश भागात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलावे लागणार आहे,’ असे काझी म्हणाले.