कोल्हापुरात सर्वप्रथम छत्रपती राजाराम महाराजांनी विमानतळाची उभारणी केली. यामुळे आता अत्याधुनिक झालेल्या कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी गेले कित्येक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे अनेक वेळा दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता सततच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कालच मी कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनसच्या इमारतीची पाहणी केली. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते. त्यानुसार छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून याबाबत माझ्याकडे प्रस्ताव आला आहे. आमच्या कार्यालयकडून तो मंजूर करून आता केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया राबवण्यात येईल असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले आहेत.
‘नऊ वर्षात दुप्पट संख्येने विमानतळ बांधले’
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याने गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कशा पद्धतीने परिवर्तन झाले हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या केंद्रीय मंत्र्यांकडून होत आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या नऊ वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी त्यांच्या विभागाबाबत बोलताना ते म्हणाले की, २०१४ च्या आधी देशात ६८ वर्षाच्या इतिहासात केवळ ७४ विमानतळ होते. मात्र गेल्या नऊ वर्षात आम्ही आणखी ७४ विमानतळ उभे केले असून एकूण २२० विमानतळ बांधण्याचा आमचा उद्देश आहे. तर करोनाच्या काळात प्रगत देशांमध्ये हातात केसपेपर घेऊन नागरिक फिरत होते. मात्र भारतात मोबाइलवर कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्याची कामगिरी मोदी यांनी करून दाखवली असेही ते यावेळी म्हणाले.
‘महिला कुस्तीपटूंच्या आरोपाचे लवकरच ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार’
तर, गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू आहे. भाजपचे खासदार ब्रुजभूषण सिंह यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असून यामुळे महिला कुस्तीपटूंचा खच्चीकरण करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. याबाबत केंद्र सरकार कुस्तीपटूंच्या बाजूने उभे राहणार का आणि काय कारवाई करणार असे विचारले असता, ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, ‘सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे आणि आणि न्यायदेवतेवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला वेळ असते. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे ते म्हणाले आहेत.