• Sat. Sep 21st, 2024

डेक्कन क्वीन झाली तब्बल ९४ वर्षाची; केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

डेक्कन क्वीन झाली तब्बल ९४ वर्षाची; केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-मुंबई दरम्यान दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या डेक्कन क्वीनचा (दख्खनची राणी) ९४वा वाढदिवस गुरुवारी सकाळी उत्साहात साजरा झाला. या वेळी रेल्वे प्रवासी ग्रुपकडून डेक्कन क्वीन झेंडूची फुले, फुगे आणि चमचमणाऱ्या झिरमाळ्यांनी सजविण्यात आली होती. बँड पथकाचे वादन आणि प्रवाशांच्या उत्साहाने पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील वातावरण राणीच्या वाढदिवसासाठी नटले होते.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ९४ किलोचा केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या इंजिनाचे पूजन पाटील यांनी केले. या वेळी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, स्टेशन संचालक मदनलाल मीना, जनसंपर्क अधिकारी अजयकुमार, सुनील ढोबळे उपस्थित होते. सुरभी बँडच्या वादनामध्ये रेल्वेच्या इंजिनचे पूजन झाल्यावर डेक्कन क्वीन नेहमीच्या वेळेत सात वाजून १५ मिनिटांनी मुंबईला रवाना झाली. या वेळी अनेक प्रवाशांनी आपल्या लाडक्या दख्खनच्या राणीसोबत सेल्फी काढला. पालकमंत्री पाटील यांनी डेक्कन क्वीनमध्ये फिरून सुविधांची पाहणी केली.

या वेळी पाटील म्हणाले, ‘पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांचे डेक्कन क्वीनसोबत एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. घरात एखादा वाढदिवस असावा अशी लगबग मला दिसली. या प्रवासी संघटनेने माझ्याकडे केलेल्या मागण्यांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेशन करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सुविधा निर्माण होत आहेत. त्यासोबत स्टेशन बाहेरच्या गजबजलेल्या परिसरात सुधारणा केल्या जाणार आहेत.’

डेक्कन क्वीनचा प्रवास

— पुणे-मुंबईदरम्यान एक जून १९३० रोजी डेक्कन क्वीन सुरू झाली होती.
— या गाडीचे नाव सुरुवातीला ‘ब्ल्यू बर्ड बेबी’ असे होते.
— डेक्कन क्वीन ही डायनिंग कार असणारी भारतातील पहिली रेल्वे आहे.
— या गाडीला गेल्या वर्षी एलएचबी कोच जोडण्यात आले.
–‘व्हिस्टाडोम कोच’ला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद आहे.

महापालिकेच्या दारासमोरच निघतायेत कारभाराचे वाभाडे; भुयारी मार्गात प्रवाशांची घुसमट, उपाययोजना कधी?
रियाने साकारले डेक्कन क्वीनचे चित्र

डेक्कन क्वीनच्या वाढदिवसानिमित्त आठवीत शिकणाऱ्या रिया दाणी या मुलीने डेक्कन क्वीनचे एक चित्र रेखाटले होते. घाटमाथ्यावरून धावणाऱ्या या चित्राने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तिचे वडील चेतन दाणी हे डेक्कन क्वीनचे नियमित प्रवासी आहेत. अनेकदा रियाही या गाडीने प्रवास करते. वडिलांच्या आग्रहाखातर तिने हे चित्र साकारून वडिलांना भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed