या महिलेने रेल्वे पोलिसांना तक्रार दिली तेव्हा आपला मोबाईल फोन कोणी चोरला की तो ट्रेनमध्ये राहिला, याविषयी तिला खात्री नव्हती. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी CSMT स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यामध्ये एक व्यक्ती लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात चढत असल्याचे दिसले. त्यानंतर हा व्यक्ती सीएसएमटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या व्यक्तीचा चेहरा ब्लर दिसत होता. त्यामुळे त्याची नेमकी ओळख पटवणे शक्य होत नव्हते. त्यावर रेल्वे पोलिसांनी एक युक्ती शोधून काढली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीच्या पायातील चपला आणि चालण्याच्या लकबीवर लक्ष केंद्रित केले. ज्या महिलेचा मोबाईल फोन हरवला होता ती सकाळी साडेअकरा वाजताच्या लोकल ट्रेनने सीएसएमटी स्थानकात उतरली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच पोलिसांनी या वेळेस येणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याच दिवशी दुपारच्या सुमारास फलाट क्रमांक १ आणि २ वर लक्ष ठेवत असताना रेल्वे पोलिसांना तशाच चपला घातलेला आणि चालण्याची विशिष्ट लकब असलेला व्यक्ती दिसला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी ट्रेनमधील मोबाईल फोन घेतल्याची कबुली दिली.
या व्यक्तीचे नाव हेमराज बन्सिवाल (वय ३०) असे आहे. हेमराजने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी एका ट्रेनमधून दुसऱ्या बाजूला जात होता. त्यावेळी महिलांच्या डब्यात एका सीटवर त्याला मोबाई फोन दिसला. इतका महागडा फोन पाहून हेमराजच्या मनात लालसा उत्पन्न झाली आणि त्याने फोन घेऊन पळ काढला. हेमराज बन्सिवाल हा कुर्ला येथे राहणारा असून तो टी-शर्ट विक्रेता आहे. त्याला घरभाडं भरण्यासाठी आणि धान्य भरण्यासाठी पैसे हवे होते. त्यामुळे आपण मोबाईल विकल्याचे हेमराजने पोलिसांना सांगितले.
अवघ्या ३५०० रुपयांना मोबाईल विकला
हेमराज बन्सिवाल याने चौहान नावाच्या व्यक्तीला फोन विकला होता. या दोघांनाही हा फोन कसा वापरायचा, हे माहिती नव्हते. हेमराजने तब्बल २ लाखांचा हा फोन हेमराजला अवघ्या ३५०० रुपयांमध्ये विकला. देविलाल चौहान हा पादत्राणांच्या दुरुस्तीचे काम करतो. हेमराज आणि देविलाल हे दोघेही राजस्थानमधील असून दोघेही कुर्ला येथे राहतात, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली.