• Sat. Sep 21st, 2024

अभिमानास्पद! नव्या संसदेच्या उभारणीत पुणेकराचं मोठं योगदान; मोदींचं स्वप्न कसं केलं साकार? जाणून घ्या…

अभिमानास्पद! नव्या संसदेच्या उभारणीत पुणेकराचं मोठं योगदान; मोदींचं स्वप्न कसं केलं साकार? जाणून घ्या…

पुणे : भारतीय लोकशाहीचे नवे मंदिर अशी बिरूदावली लाभलेल्या नव्या संसद भवनाचा पाया ते कळस एका पुणेकराच्या नेतृत्वाखाली रचला गेला आहे. सूक्ष्म नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीच्या बळावरच हा प्रकल्प मार्गी लागला. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम केल्यानेच करोनासारख्या आव्हानात्मक काळातही कमीतकमी वेळेत हा प्रकल्प साकारल्याची प्रांजळ भावनाही त्यांच्या मनात आहे.पुण्याच्या विनायक देशपांडे यांनी या भव्यदिव्य प्रकल्पात आपला सहभाग नोंदवला आहे. देशपांडे नव्या संसद भवनाच्या उभारणीचे कंत्राट मिळालेल्या टाटा प्रोजेक्ट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते. सध्या या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. देशपांडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला प्रकल्पाविषयी आणि त्यातील त्यांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली.

‘प्रचंड आव्हानात्मक काम’

‘संसदेची नवी इमारत जुन्या संसदेला लागूनच आहे. जुन्या संसदेत कामकाज सुरू असताना नवी दिल्लीतील पर्यावरण संवर्धनाचे निकष सांभाळून नव्या संसदेची उभारणी करायची होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही काटेकोर नियोजनावर भर दिला. संपूर्ण प्रकल्पाचे थ्रीडी मॉडेल बनवले. वेळेचे गणित आणि कामाचा दर्जा यात अजिबात तडजोड केली नाही. कामाचा वेळ वाचविण्यासाठी संसदेचे बांधकाम करतानाच अंतर्गत रचनेसाठी आवश्यक लाकूड, फर्निचर आणि इतर आवश्यक घटकांच्या निर्मितीचे काम सुरू झाले होते,’ असे देशपांडे म्हणाले.

‘राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक’

प्रकल्पासाठीच्या विविध वस्तू विविध राज्यांतून आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे यातही राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक दिसते. धातूकाम, स्टील, फर्निचर, मार्बल, फरश्या, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स आदीसाठी सर्वोत्तम पुरवठादार निवडण्यात आले. प्रकल्पाचे विविध भाग बाहेरूनच तयार करून रात्री ते प्रकल्पस्थळी आणून त्याची जुळणी केली गेली.

राष्ट्रीय कर्तव्यपूर्तीची भावना

काम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन चार वेळा प्रकल्पाची पाहणी केली. मजुरांशी आपुलकीने संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत विचारणा केली. त्यांना या कामाविषयी काय वाटते, हेही जाणून घेतले. पंतप्रधानांपासून ते आमचे अधिकारी, कर्मचारी, सर्व पुरवठादार आणि प्रत्यक्ष काम करणारे मजूर या सर्वांमध्ये या कामाविषयी अत्यंत तळमळ होती. त्यामुळे सर्वांनी कमीतकमी वेळेत सर्वोत्तम योगदान दिले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर, टाटा प्रोजेक्ट्सची संपूर्ण टीम यांचेही या कामाकडे लक्ष होते, असेही देशपांडे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गावर ‘अ‍ॅग्रो लॉजिस्टिक पार्क’ उभारण्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना असा होणार फायदा
आमच्यासाठी हा केवळ बांधकाम प्रकल्प नव्हता, तर राष्ट्रीय कर्तव्य होते. हा प्रकल्प नव्या, प्रगत भारताची ओळख आहे. या प्रकल्पामुळे युवा पिढीला प्रेरणा, आत्मविश्वास मिळेल. प्रतिकूल परिस्थितीतही हा प्रकल्प पूर्ण करता आला, याबद्दल मनात कृतार्थतेची भावना आहे.- विनायक देशपांडे, प्रकल्प सल्लागार, नवीन संसद भवन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed