एक महिला खासदार म्हणूनच नाही, तर जन्माने मी एक महिला असल्याने माझं हे निश्चित मत आहे की, कुठल्याही महिलेची जेव्हा अशी तक्रार येते तेव्हा त्याची दखल घेतली गेली पाहिजे. मला वाटतं की दखल घेऊन त्याची तपासणी करावी आणि ती योग्य आहे की अयोग्य आहे हे चौकशी समितीने किंवा ज्यांना कोणाला तपासणीचे अधिकार दिले गेले असतील त्यांनी त्याविषयीचा निर्णय घ्यावा. पण महिलांच्या तक्रारींची दखल ही घेतली जायलाच हवी आणि जे काही खरं खोटं असेल तर लवकरच जगापुढे यावं असं मला वाटतं, असं खासदार मुंडे यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीबाबत प्रीतम मुंडे यांना प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, मी काम करते का नाही याचा लेखाजोखा जनता देईल. विरोधी उमेदवार चांगला असावा, मग आपल्याला प्रेरणा मिळते. राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अर्धी आपण जिंकलेली आहे. तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर मला आनंद वाटायला हवा. पण मला आनंद वाटत नाही. त्यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी समोर लढवायच ठरवलं तर काही नाही. तसं बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत राहिली आहे.
‘परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्जाबाबत मी प्रयत्नशील’
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा दर्जा गेला आहे असं ज्यांनी सांगितलं त्याचा अर्थ या आधी दर्जा होता. मग त्याचे कागदपत्रे असतील. ज्यांनी असे दावे केलेले असतील त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे. वाद निश्चित आहे. दुर्दैवाने हा वाद एकट्या परळी ज्योतिर्लिंगाचा नाही अनेक ज्योतिर्लिंग विषयी संभ्रम आहेत. केंद्राच्या यादीत यावं म्हणून मी प्रयत्न करीत आहे.