यावल तालुक्यातील सावखेडासिमजवळ निंबादेवी धरण आहे. या धरणापासून काही अंतरावर निमछाव तांडा आहे. निमछाव याठिकाणी आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. निमछाव येथील आसाराम बारेला आणि निरमा बारेला ही दोन्ही जण गुरे चारण्यासाठी गेली होती. गुरे चरता-चरता, गुरांना पाजण्यासाठी दोघेही निंबादेवी धरणाजवळ आली. याठिकाणी गुरे पाण्यात गेल्याने गुरांच्या पाठोपाठ दोघेही धरणाच्या पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने आसाराम बारेला आणि निरमा हे दोघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले. एकाचा पाय घसरला, त्याला वाचवायला दुसरा गेला असता दुसराही धरणात बुडाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे.
बराच वेळ होवूनही दोन्ही बालक घरी परतली नाहीत, म्हणून कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरु झाल्यानंतर दोघेही निंबादेवी धरणात बुडाल्याचे समोर आले आहे. पोलीस पाटील यांच्या माध्यमातून घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल संजय देवरे, होमगार्ड जनार्दन महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शोधण्यासाठी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहिम राबविली. रात्री उशीरापर्यंत फक्त आसाराम याचाच मृतदेह मिळून आला होता. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने शोध मोहिम राबविण्यात आली. यादरम्यान निरमा हिचाही मृतदेह मिळून आला.
दोघेही पहिल्यांदाच गेले धरणावर अन् अनर्थ घडला
आसाराम हा इयत्ता नववीमध्ये वाघजिरा आश्रम शाळेत शिक्षण घेत होता. तर निरमा किसन बारेला ही निमच्या गावठाण येथे असलेल्या प्राथमिक शाळेतच चौथ्या वर्गात शिकत होती. आसाराम आणि निरमा हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून एकाचेळी दोघांच्या मृत्यूने निमछाव तांडा सुन्न झाला आहे. दोघेही पहिल्यांदाच धरणावर गुरांना पाणी पाजण्यासाठी गेली होती आणि याचदरम्यान अनर्थ घडला अशीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे करीत आहे.