याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोणावळा परिसरात असणाऱ्या टायगर पॉइंट (Tiger Point) परिसरात गौरव ठक्कर हा चारचाकी गाडीतून फिरायला गेला होता. मात्र गाडी अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या ६० फूट खोल दरीत कोसळली. त्यामुळे हे गौरव प्रचंड घाबरला होता. त्याने आपल्या पत्नीला फोनवरुन याविषयी माहिती दिली. त्यानंतर या घटनेबाबत संबधित व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना फोन केला की, माझे पती दरीत पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत पडलेल्या कारचा शोध घेण्यास सुरुवात केली. तासाभराच्या प्रयत्नानंतर सायंकाळच्या सुमारास ही कार खोल दरीत पडलेली पोलिसांना आढळली. टायगर पॉइंटजवळ असलेल्या घुबड तलावाजवळ ही कार पोलिसांना आढळली.
पोलिसांनी कुठली मागचा पुढचा विचार करून पोलीस निरीक्षक भारत भोसले यांनी दरीत उतरून गाडीतील व्यक्तींना बाहेर काढले. संबधित व्यक्ती ही यात गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरव ठक्कर असे या व्यक्तीचे नाव असून ती मुंबई येथील राहणारी आहे. पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी ही कामगिरी केली आहे. या कामगिरीने पोलिस भोसले यांचे कौतुक होत असून या कामगिरीने पोलिस दलाची मान उंचावली असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत.