चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील मूळ रहिवासी असलेल्या धानोरकर यांचा जन्म यवतमाळ येथे ४ जुलै १९७५ रोजी झाला. त्यांनी वणी येथून औषधशास्त्राची पदवी घेतली. व्यवसाय करीत असतानाच ते शिवसेनेत सक्रिय झाले. स्थानिक शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी पदे त्यांनी सांभाळली. स्पष्टवक्ता आणि झटपट काम करणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली. २००९मध्ये शिवसेनेने त्यांना वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. धानोरकर यांना काँग्रेसच्या संजय देवतळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. २०१४च्या निवडणुकीत मात्र धानोरकर यांनी देवतळे यांचा पराभव केला.
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर हे त्यांच्या लोकोपयोगी कार्य आणि गरिबी निर्मूलनासाठी कायम आठवणीत राहणार आहेत. या दु:खद प्रसगी संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर त्यांनी नाट्यमय घडामोडींनंतर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी काँग्रेसकडून तिकीट मिळविले. तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसला राज्यातून ही एकच जागा राखता आली होती. दुपारी दीड वाजता दिल्लीवरून धानोरकर यांचे पार्थिव नागपूरमार्गे वरोऱ्याला आणण्यात आले. त्यांच्या येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. एक तडफदार नेता अकाली गेल्याने राज्याची हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
जमिनीशी जुळलेला नेता म्हणून खासदार बाळू धानोरकर यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.
-मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे अध्यक्ष
वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते
चार दिवसांपूर्वीच बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्काराला खा. धानोरकर यांना उपस्थित राहता आले नव्हते. किडनी स्टोनचा त्रास वाढल्याने धानोरकर यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असतानाच त्यांच्या आतड्यांमध्ये संसर्ग झाला. रविवारी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने नवी दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सातत्याने खालावत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांच्याकडून उपचाराला अल्प प्रतिसाद मिळत होता. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.