मुंबईत वास्तव्य करणारे प्रवीण दिवेकर हे काही महिन्यांपासून बेरोजगार होते. त्यामुळे कौटुंबिक कलहातून ते नाशिकमध्ये मुक्कामी होते. जेलरोडच्या दुर्गामाता मंदिरालगतच्या रामेश्वरनगरातील हेतल हाउसिंग सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरील बारा क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ते भाडेतत्वावर राहत होते. दिवेकर एकटेच राहत असल्याने त्यांचे आईवडील सोमवारी (दि. २९) भेटीसाठी आले. त्यावेळी खून झाल्याची बाब उघड झाली. उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त अंबादास भुसारे, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांनी त्वरित पथके मार्गस्थ केली. सुगाव्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या पथकाने आडगाव हद्दीतून संशयितांना मंगळवारी (दि. ३०) पहाटे ताब्यात घेतले.
– संशयित पवार आणि मयत दिवेकर सन २०१२ पासून परिचित
– दलित पॅन्थर संघटनेमध्ये पवार-दिवेकरांची ओळख
– संशयित पवार हा सराइत गुन्हेगार. खरेदी-विक्रीचा व्यवसाय
– अल्पवयीन मुलगा सतरा वर्षांचा. सीसीटीव्ही दुरुस्तीची नोकरी
नेमकं काय घडलं?
संशयित पवार आणि अल्पवयीन मुलगा दिवेकर यांच्याबरोबर त्यांच्या फ्लॅटवर रविवारी रात्री मद्य प्राशनासाठी बसले. मध्यरात्री दारू पिताना ‘मी तुला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी करतो. तुझ्या वडिलांकडून १५ हजार रुपये घेऊन दे’, अशी मागणी दिवेकरने पवारकडे केली. पवारने त्यासाठी नकार दिला. त्यामुळे कांदा कापण्यासाठी ठेवलेला छोटा चाकू दिवेकर यांनी पवारच्या दिशेने फेकला. प्रसंगावधान राखून पवार बाजूला झाल्याने त्याला दुखापत झाली नाही. परंतु, चाकू फेकल्याचा राग आल्याने पवारने स्वयंपाकघरातून दुसरा चाकू आणून दिवेकर यांच्या गळ्यावर आणि छातीवर सपासप वार केले. तसेच जवळ पडलेला कुकरही दिवेकरच्या डोक्यात घातला. यात दिवेकर यांचा मृत्यू झाला.