• Sat. Sep 21st, 2024

फडणवीसांनी वाद मिटवला पण रामभाऊंची पुन्हा टस्सल, म्हणाले-श्रेष्ठींनी सांगितले म्हणून…

फडणवीसांनी वाद मिटवला पण रामभाऊंची पुन्हा टस्सल, म्हणाले-श्रेष्ठींनी सांगितले म्हणून…

अहमदनगर: ‘पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात वस्तुस्थिती मी पक्षश्रेष्ठींना सांगितली होती. त्यावर विखे पाटलांकडून काही प्रत्युत्तर आले नाही. म्हणजेच मी केलेला दावा खरा होता. परंतु श्रेष्ठींनी मला सांगितल्याने मी याआधी दोनदा थांबलो आहे. आताही थांबत आहे’, असे सूचक वक्तव्य भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी येथे केले. राधाकृष्ण विखे हे ज्येष्ठ आहेत. त्यांनी माझी जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले, याचे मी स्वागत करतो, असेही शिंदे म्हणाले.जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांनी मदत केली नाही म्हणून प्रा. शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या दौऱ्यात विखे व शिंदे यांना आपल्या शेजारी बसवून या दोघांमधील वाद चहाच्या पेल्यातील आहे, वाद आहेत पण ते वादळ नाही, असे भाष्य करीत दोघांमधील वाद मिटल्याचे जाहीर केले.

पाटील आडनावाचा वाद : सुषमा अंधारे यांची गौतमीसाठी रोखठोक पोस्ट, फुल्ल सपोर्ट!
या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रसार माध्यामांशी बोलताना शिंदे म्हणाले, ज्यांच्या विषयी तक्रार केली, त्यांच्याकडून प्रत्युत्तर आले नाही. त्यामुळे मी जो दावा केला होता तो खरा होता. पण वरिष्ठांनी सांगितले की कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे मी एकदा व दोनदा थांबलो आहे, ज्यांनी कोणी काही केले, त्यांनीही आता थांबले पाहिजे. आम्ही एकाच पक्षात असल्याने वारंवार असे प्रसंग येऊ नयेत.

आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं, कामगाराचा मुलगा कामगार आयुक्त बनला!
भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. मीही पार्टी बेस कार्यकर्ता आहे. माझे म्हणणे मी अचानक मांडले नव्हते. दोन महिने मी थांबलो होतो, परंतु ज्या घटना घडल्यात, त्या मनात राहतातच. राज्याच्या नेतृत्वाने सांगितल्यावर मी दोन पावले मागे आलो आहे. भविष्यात तेही दोन पावले मागे येतील. भाजपमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळतोच, त्यांची गळचेपी होत नाही. मला पुन्हा विधान परिषदेवर पाठवले आहे, त्यामुळे मी पक्षावर नाराज नाही. मी लढवय्या आहे, भविष्यात असे वाद होऊ नयेत अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed