पुणे : पुणे-नगर मार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आता नाशिक फाटा ते खेडपर्यंतच्या सुमारे ३० किलोमीटरच्या ‘उन्नत मार्ग’ (एलिव्हेटेड) महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात या कामासाठी येत्या ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय़) पुण्यातील महामार्गांच्या कामांना गती मिळणार आहे. या प्रकल्पांसाठी राज्य सरकारचा नेमका किती वाटा असणार याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एलिव्हेटेड महामार्गांचा प्रस्ताव ‘एनएचएआय’ने तयार केला आहे. त्यामध्ये नाशिक फाटा ते खेड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर; तसेच पुणे-शिरुर मार्गावरील वाघोली-शिक्रापूर-रांजणगाव, हडपसर-यवत या मार्गावर ‘एलिव्हेटेड महामार्ग’ तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या कामांचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे.
या संदर्भात दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. त्या वेळी ‘एनएचएआय’ने पुण्यातील विविध मार्गांचे सादरीकरण करीत ३५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे दिल्याचे जाहीर केले.
या संदर्भात दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. त्या वेळी ‘एनएचएआय’ने पुण्यातील विविध मार्गांचे सादरीकरण करीत ३५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे दिल्याचे जाहीर केले.
ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात
‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, ‘पुण्यातील विविध ठिकाणच्या ‘एलिव्हेटेड महामार्गां’च्या ‘डीपीआर’ला केंद्राने मान्यता दिली आहे. नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटरच्या मार्गांचे भूसंपादन सुरू झाले आहे. या आठ पदरी ‘एलिव्हेटेड महामार्गा’साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ६१ मीटर आणि मोशीच्या पुढे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकारणाने (पीएमआरडीए) राजगुरुनगरपर्यंतची ४५ मीटर जागा देण्याचे मान्य केले आहे.
त्यामुळे भूसंपादनाचे काम झाल्यावर येत्या ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात या मार्गाचे काम सुरू होईल. वाघोली ते शिक्रापूर या एलिव्हेटेड महामार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम अद्याप सुरू आहे.’