मूळचे हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील बालाजी उबाळे हे आपल्या परिवारासह दहा वर्षांपूर्वी सेलू शहरात स्थायिक झाले होते. त्यांची मुलगी संयुक्ता उबाळे शेलू शहरातील नूतन महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. नुकतीच पार पडलेली बारावीची परीक्षा तिने दिली होती. परीक्षेदरम्यान तिची तब्येत ठीक नसल्याने तिला रुग्णालयात देखील नातेवाईकांचे फोन येत होते. नुकत्याच दिलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील आणि आपणच नापास होऊन अशी भीती तिच्या मनामध्ये काही दिवसापासून होती. शिक्षण विभागाने बारावीचा निकाल २५ मे ला जाहीर होणार असल्याची घोषणा केली.
आपण बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणार या चिंतेत असलेल्या संयुक्ता उबाळे हिने २४ मे रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केली असल्याची बाब बाहेरून घरी परतल्यानंतर आईच्या लक्षात आली. तिच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या जाण्यानंतर आईवडिलांचा आक्रोश काळीज चिरणारा होता. या प्रकरणी बालाजी उबाळे यांनी सेलू पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पास झाली पण निकाल बघायला या जगात नव्हती!
विशेष बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी बारावीचा निकाल लागल्यानंतर संयुक्ता उबाळे बारावीच्या परीक्षेमध्ये पास झाली होती. घटनेची माहिती मिळताच शेलू पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तर मयत मुलीचे शेलू उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. या घटनेमुळे उबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.