यावेळी गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातही भाष्य केले. लोकसभेच्या २२ जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही. २०१९ साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावापट झाले तेव्हा आम्ही २३ तर भाजपने २६ जागा लढवल्या. यापैकी २२ जागांवर भाजपचे आणि १८ जागांवर आमचे खासदार निवडून आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील. त्यादृष्टीने आमची तयारी झाली आहे, असा दावाही गजानन कीर्तिकर यांनी केला.
शिंदे गटाकडून लोकसभेच्या २२ जागांवर लढण्याची तयारी?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीप्रमाणे भाजप-शिंदे गटातही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे गटाने लोकसभेच्या २२ जागा लढवण्यासाठी तयारी सुरु केल्याची माहिती आहे. मात्र, आक्रमकपणे आपल्या पक्षाचा विस्तार करणाऱ्या भाजपला ही बाब कितपत मान्य होईल, हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिवसेनेच्या १३ खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली २०१९ मध्ये लढवलेल्या २३ पैकी २२ जागांवर दावा सांगितला आहे. १३ खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. लोकसभेच्या या २२ जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. मात्र, आता भाजप यावर काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.