यावर्षी ३१ मे रोजी विधान परिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या पुढाकारातून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा सरकारी कार्यक्रम होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी कार्यक्रमासाठी सरकारने ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जोरदार करून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजपने केली आहे.
तर दुसरीकडे कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सकाळी चौंडीत यात्रा आयोजित केली आहे. अहिल्यादेवींच्या कर्मभूमीतून आलेले हत्ती, घोडे तसेच टाळकरी यांची ही शोभा यात्रा असेल. मात्र, पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात दोन जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आला आहे. तरीही यात्रा काढण्यावर पवार ठाम आहेत. पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरीही सकाळी गावातून यात्रा काढणारच. आमचा सरकारी कार्यक्रमाला पाठिंबा आहे, ग्रामस्थ आमच्यासोबत आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे.
अहिल्यादेवींच्या कर्मभूमीतून हत्ती, घोडे, टाळकर, वारकरी आणण्यात येत आहेत. त्यांसोबत ग्रामस्थही सहभागी होऊन सकाळी सात वाजताच गावातून यात्रा काढायची. महादेव मंदिरात आणि होळकर यांच्या स्मारकात जाऊन दर्शन घ्यायचे, त्यानंतर महाप्रसाद असा धार्मिक कार्यक्रम रोहित पवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे. मुख्य सरकारी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तो संपविण्यात येईल, अशी हमीही देण्यात येत आहे. तरीही परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
गेल्यावेळी पडकरांना नो एन्ट्री, आता रोहित पवारांना परवानगी नाकारली
गेल्यावर्षी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी आमदार पवार यांच्या पुढाकारातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते आले होते. त्यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिंदे यांना सामांतर कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. चौंडीत प्रवेश करण्यापूर्वीच पडळकर यांना पोलिसांनी रोखून धरले होते. त्यावेळी पोलिसांसोबत त्यांचा संघर्ष झाला, तसचे तत्कालीन सरकारवर आरोप केले होते.
सरकारी कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे व पडळकर यांच्यासह अन्य नेत्यांनी चौंडीत येऊन सभा घेतली होती. त्यानंतर पुढे पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी करून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती.