• Sat. Sep 21st, 2024

Jalgaon News : चिमुकले २१ दिवसांनी विसावले मातांच्या कुशीत; नवजात शिशूंचे अदलाबदल प्रकरण

Jalgaon News : चिमुकले २१ दिवसांनी विसावले मातांच्या कुशीत; नवजात शिशूंचे अदलाबदल प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चुकीच्या सूचनेमुळे नवजात अर्भकांची अदलाबदल झाल्याच्या प्रकरणावर अखेर पडदा पडला. डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन्ही चिमुकले अखेर त्यांच्या मूळ मातांच्या कुशीत विसावली. यावेळी दोन्ही माता भावुक झाल्या होत्या. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही चिमुकल्यांना मातेच्या प्रेमापासून तब्बल २१ दिवस वंचित राहावे लागले.

काय आहे प्रकरण?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दि. २ मे रोजी दोन गरोदर महिलांना अत्यवस्थ झाल्यामुळे शस्त्रक्रियागृहामध्ये सीजर शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. दोन्ही महिलांची प्रकृती गंभीर झाली होती. या प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय कौशल्य पणाला लावून दोन्ही मातांचे जीव वाचविले. मात्र, त्याचवेळी दोन्ही मातांची नवजात अर्भक ही गैरसमजुतीमुळे एकमेकांना देण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून बाळांना मूळ मातांकडू सुपूर्द केले. मात्र बाळांचे पालक समाधानी नव्हते. त्यांनी डीएनए चाचणीची मागणी केली. त्यानुसार जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्यानुसार दोन्ही माता आणि बाळांचे डीएनए नमुने घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

अखेर हा बहुप्रतीक्षित अहवाल मंगळवारी (दि. २३) सायंकाळी रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला. अनेक दिवसांपासून माता व बाळांची झालेली ताटातूट पाहता प्रशासनाने तत्काळ बाळ मूळ मातांना सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी कॉन्स्टेबल नरेंद्र दिवेकर व रुग्णालय प्रशासन यांच्या उपस्थितीत दोन्ही मातांना त्यांच्या नातेवाइकांसह बोलवण्यात आले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता तथा स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे यांनी डीएनए अहवाल वाचून दाखविला.

Jalgaon News: वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना! २६ बोटांच्या बाळाचा जन्म, जळगावात चर्चाच चर्चा
अहवालानुसार सुवर्णा उमेश सोनवणे यांना मुलगी, तर प्रतिभा प्रवीण भिल यांना मुलगा झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोन्ही मातांना त्यांची मुलं सुपूर्द करण्यात आली. यावेळी दोन्ही मातांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. संजय बनसोडे, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed