काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता. गेली दोन-तीन वर्षे पावसाळ्यात वाहतूक बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येत आहे. यावर्षी हे टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी २५ एप्रिल ते १० मे या कालावधीत परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या घाटातील एक अवघड खडक फोडण्यात अलीकडेच यश आले आहे. कल्याण टोलवेज कंपनी या घाटाचे काम करत आहे. उजव्या बाजूकडील मार्गिकेवरील काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. पाच ते सहा किलोमीटरचे काँक्रिटीकरणाचे काम येत्या आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.
दरड कोसळण्याचा धोका कमी
यंदाच्या पावसाळ्यात या घाटात मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाताना डाव्या बाजूकडून दरड खाली कोसळण्याचा धोका कमी आहे. गेली दोन वर्षे या डोंगराकडील बाजूवर पाऊस पडल्याने यावर्षी दरड कोसळण्याचा धोका कमी राहणार असला तरी या बाजूकडील वाहतूक मार्गिका यंदा पावसाळ्यात सुरू केली जाणार नाही.
मुंबई कडून गोव्याच्या दिशेने जाताना परशुराम घाटातील उजव्या बाजूला असलेल्या दरीच्या दिशेकडील पेढे परशुराम गावाकडील सेफ्टी रिटर्निंग वॉलचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या बाजूकडील वाहतूक नियमीतपणे सुरू ठेवण्यात येणार आहे त्यामुळे यंदाचा पावसाळा हा परशुराम घाटासाठी सुखकर ठरेल अशी आशा आहे. सद्यस्थितीत या घाटातील वाहतूक नियमित सुरू असली तरी काहीशी विस्कळीत असून धुरळयाचा त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. गेले तीन ते चार वर्षे कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील महामार्गाचे काम वादातीत ठरले होते.