म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : एकीकडे परवाना न घेता श्वान पाळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला असताना दुसरीकडे ‘शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महानगरपालिका कार्यालयात मोकाट श्वान सोडू,’ असा इशारा ‘राष्ट्रवादी काँग्रेस महिला अर्बन सेल’ने दिला आहे.परवाना मिळवल्याशिवाय श्वान पाळू नये, असा सरकारी नियम आहे. त्यानुसार महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने ऑनलाइन श्वान परवाना सोय उपलब्ध केली आहे. त्याअंतर्गत गेल्या नऊ महिन्यांत शहरातील ६७१ श्वानमालकांनी ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे. कार्यालयात येऊन श्वान परवाना घेण्यास नागरिक फारसे उत्सुक नव्हते, असे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे ऑगस्ट २०२२पासून संगणक प्रणालीच्या माध्यमातून श्वान परवाना उपलब्ध करून घेण्याची सोय करण्यात आली. या सुविधेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चार ऑगस्ट २०२२ ते १८ मे २०२३ या कालावधीत ६७१ नागरिकांना ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे. परवाना प्राप्त झाल्यापासून पुढील एक वर्षासाठी ऑनलाइन परवान्याची मुदत असेल. त्यानंतर दर वर्षी परवान्याचे नूतनीकरण बंधकारक राहील. श्वानास रेबीज लसीकरण बंधनकारक असल्याचे पशुवैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.
अतिरिक्त आयुक्तांना दिले निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेल महिलाध्यक्षा मनीषा गटकळ यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
मुले, ज्येष्ठांना धोका
निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेच्या मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, उड्डाणपुलाखाली बेवारशी मोकाट श्वान टोळक्याने एकत्र बसतात. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर भुंकतात. प्रसंगी चावतात. या प्रसंगातून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात कित्येकदा अपघात होतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी या सर्वांनाच धोका निर्माण होत आहे.
बारामतीत खळबळ! साडेतीन वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, महिन्याभरात दोन हल्ले
कार्यालयात निषेधाचा इशारा
औद्योगिक क्षेत्रातून काम करून घरी ये-जा करणाऱ्या कामगारांवर मोकाट श्वान धावून जातात. या श्वानांचा महापालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा; अन्यथा आयुक्त कार्यालयात मोकाट श्वान सोडून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा गटकळ यांनी दिला आहे. या वेळी लता ओव्हाळ, विजया काटे, युसूफ कुरेशी उपस्थित होते.