ठाणे-पुणे ई-शिवनेरीने अवघ्या सात दिवसात दीड हजार प्रवाशांनी प्रवास करत २० लाखांहून अधिक महसूल मिळवला आहे. या मार्गावर सध्या १४ ई-शिवनेरी बस सुरू आहेत. रोज ई-शिवनेरीच्या तीन फेऱ्या होतात. गेल्या ७ दिवसात ८१ रुपये प्रति किमी या दराने २० लाख ६७ हजार रुपये ई-शिवनेरीने कमावले आहे, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या जागेवर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम संबंधित कंपनीचे आहे. महामंडळाने जागा दिली असून ई-शिवनेरी देखील तयार आहेत. मात्र संबंधित कंपनीचे चार्जिंग स्टेशन नसल्याने मुंबईहून ई-शिवनेरी सुरू करणे अडचणीचे ठरत आहे.
संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध आहेत. बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असून बसमध्ये ४३ प्रवासी बसू शकतात. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरचा टप्पा पार करण्याची क्षमता ई-शिवनेरीमध्ये आहे.