बारामती : शहरातील खत्री इस्टेटमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक साडेतीन वर्षाचे बालक जखमी झाले आहे. दि.१६ रोजी दुपारी ही घटना घडली आहे.युवान केदार जाचक (रा. खत्री इस्टेट, कॅनॉल रोड, बारामती) असे जखमी बालकाचे नाव आहे. याच भागात महिन्याभरातील लहान बाळांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांच्या संतापसह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.युवान हा आज दुपारी घराच्या अंगणात खेळत असताना चार पाच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानकच हल्ला चढवला व त्याच्या हातापायांना जोरदार चावा घेतला. काही क्षणातच स्थानिक नागरिक तसेच त्याचे पालक धावून आल्याने कुत्री पळून गेली. मात्र यात युवान कमालीचा घाबरला होता. त्याला तातडीने बालरोगतज्ञ डॉ.सौरभ मुथा यांच्याकडे पुढील उपचारासाठी पालकांनी नेले. दरम्यान त्याची प्रकृती स्थिर असून त्याला काही इंजेक्शन्स द्यावी लागतील, अशी माहिती डॉ. मुथा यांनी दिली.
गेल्याच महिन्यात याच भागात आश्वी जगदाळे या मुलीला भटक्या कुत्र्यांनी वीस ठिकाणी चावे घेत जखमी केले होते. ते प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा त्याच ठिकाणी युवान जाचक याला भटक्या कुत्र्यांनी जखमी केल्यानंतर आता लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बारामती नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या बाबत ठोस उपाययोजना करावी, अशी बारामतीकरांची मागणी आहे.

बारामती शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भटक्या जनावरांचा उपद्रव वाढत असून, लहान थोरांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत नुकतेच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे बारामतीकरांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पवारांनी पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावत भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या सप्त सूचना केल्या होत्या.
मात्र पवारांनी सूचना केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच पुन्हा लहान बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे.. पवारांनी सूचना करूनही पालिका प्रशासन अजून झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे.