त्वचेचा हा संसर्ग स्टॅफिलोकोकस तसेच स्ट्रेप्टोकोकस स्वरूपाच्या विषाणू संसर्गामुळे होतो. काही मुलांना या स्वरूपाचा संसर्ग पूर्वी झालेला आहे, त्यांच्यामध्ये संसर्गाची तीव्रता पुन्हा वाढू शकते. डास चावल्यामुळेही या प्रकारचा संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिवाळ्यात या स्वरूपाच्या संसर्गाचे दोन ते तीन रुग्ण दिसतात. यावर्षी इम्पोटिगोचा प्रादुर्भाव वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या स्वरूपाच्या संसर्गामध्ये त्वचेवर लाल चट्टे उठण्यापासून त्वचेवर पुरळ आणि पू असलेले फोड येऊन ते अधिकाधिक लाल दिसून येतात. त्वचेवर यामुळे खाज सुटते. त्यामुळे योग्य वेळी वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ‘या संसर्गावर वैद्यकीय उपचार करताना मलम लावण्यासह चार ते पाच दिवसांसाठी प्रतिजैविके दिली जातात. स्वच्छता ठेवणे, पोषक आहार घेणे या आजारावर मात करण्यासाठी महत्त्वाचे असते’, याकडे लहान मुलांचे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. प्रवीण बानोडकर यांनी लक्ष वेधले.
मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आणि वाढत्या आर्द्रतेमुळे लहान मुलांमध्ये त्वचेच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. बालकाचे वय कमी असेल तर त्याला तोंडावाटे प्रतिजैविकांची गरज आहे का, हे पाहण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.
त्वचेचा संसर्ग टाळण्यासाठी काय कराल?
हात स्वच्छ ठेवा
शरीरावरील जखमांना स्पर्श करणे टाळा
स्वतःचे कपडे वा टॉवेल इतरांना देऊ नका
त्वचा कोरडी ठेवा
मुलाच्या त्वचेवर पुरळ आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
मुंबईत तापमान घटले, पण अस्वस्थता वाढली
मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात किंचित घट झाली असतानाही उकाड्यापासून मुंबईकरांना फारसा दिलासा मिळालेला नाही. या उकाड्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. एकूण मुंबईच्या तुलनेत लोकलमध्ये लागणाऱ्या उष्ण झळा, भुयारी मार्गांमध्ये जाणवणारी अस्वस्थता, द्रुतगती मार्गावर दुचाकी वाहने चालवताना जाणवणारे उन्हाचे चटके अशा उष्णतेच्या बेटांचा अनुभव देणाऱ्या ठिकाणांसंदर्भात कारणांचा शोध घेऊन त्यानुसार उपायांची गरज व्यक्त होत आहे.
सांताक्रूझ येथे सोमवारी ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. कुलाबा येथे ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. दुपारनंतर सांताक्रूझ येथे ६२ टक्के तर कुलाबा येथे ६५ टक्के आर्द्रता होती. मुंबईत सोमवारी काही ठिकाणी आभाळ ढगाळ झाल्याचेही दिसून आले. याचा संयुक्त परिणाम म्हणून मुंबईमध्ये प्रत्यक्ष तापमानापेक्षा त्याची जाणीव अधिक झाली. मुंबईकरांनीही यासंदर्भात निरीक्षण नोंदवले. मंगळवारी मुंबईत कदाचित किमान आणि कमाल तापमानात रविवार आणि सोमवारच्या तुलनेत थोडी वाढ होईल, अशी शक्यता आहे. किमान तापमान २८ तर कमाल तापमान ३५पर्यंत जाण्याची शक्यता आहे.