देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावली, मात्र तेजस एक्स्प्रेस ही जर्मन बनावटीची आहे. त्याच मार्गावर आता भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस नेमकी कधी धावणार, याची गेले अनेक महिने प्रवाशांना उत्सुकता होती. यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली होती.
देशभरातील विविध मार्गांवर ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी पहाटे ५.३५ वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटून गोव्यात मडगावला दुपारी २.३० वाजता पोहोचणे अपेक्षित आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस ही देशातील सध्याची अत्यंत प्रतिष्ठेची रेल्वे असल्यामुळे तिच्या चाचणीदरम्यान रेल्वेच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, एस अँड टी सुपरवायझर या सर्वांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चाचणीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस त्याच रात्री ११ वाजता पुन्हा सीएसएमटीला पोहोचणे अपेक्षित आहे.
आतापर्यंत मुंबईहून गांधीनगर, साईनगर शिर्डी आणि सोलापूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. २०२३ च्या अखेरपर्यंत ७५ वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस या अत्याधुनिक असून जास्तीत जास्त १८० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहेत. यात स्वयंचलित दरवाजे, वाय-फाय, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, बायो-व्हॅक्यूम टॉयलेट आणि आरामदायी प्रवासासाठी सुधारित आसन व्यवस्था असलेले एरोडायनॅमिकली डिझाइन केलेले डबे आहेत. ट्रेनमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम देखील आहे, जी ३० टक्के ऊर्जेची बचत करू शकते.