कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे हे बेंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची मोठी जबाबदारी शिंदे आणि त्यांच्या दोन जोडीदारांवर टाकण्यात आलेली आहे. सोलापुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने सुशीलकुमार शिंदे यांना बेंगलोरकडे रवाना व्हावे लागले. याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता असे समजले की, काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांना तातडीने सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांना बेंगळुरूकडे बोलावले आहे. शिंदे यांना त्वरित बेंगळुरूकडे जाण्यासाठी काँग्रेस पक्षाने खास चार्टर्ड विमान पाठवल्याची माहिती मिळाली आहे. त्या विमानाने शिंदे हे बेंगळुरूकडे रवाना झाले आहेत.
कर्नाटकात सत्ता स्थापनेत शिंदें परिवाराचा महत्त्वाचा वाटा
कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी सुशीलकुमार शिंदे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावणगिरी जिल्ह्यातील मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. त्यामध्ये आठ पैकी सात जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. यावरून सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे कर्नाटकातील सर्व नेत्यांशी संबंध पाहता कर्नाटकमधील सत्ता स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असेल, असे मानले जात आहे.