• Sat. Sep 21st, 2024

नवी मुंबईकर घामाघूम! दुपारच्या वेळेत अघोषित संचारबंदी; मुंबईपेक्षाही तापमान अधिक

नवी मुंबईकर घामाघूम! दुपारच्या वेळेत अघोषित संचारबंदी; मुंबईपेक्षाही तापमान अधिक

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबईत आता कडक उन्हाळा जाणवू लागला असून सद्यस्थितीत सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस इतके असते. त्यामुळे नवी मुंबईकरांची काहिली वाढली आहे. दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र आहे. रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. अनियंत्रित बांधकामे, नवीन प्रकल्प, सिमेंट-काँक्रिटीकरण, विमानतळ विकास, औद्योगिकीकरण आणि पदोपदी तयार होत असलेले सिमेंटचे जंगल या कारणांमुळे मुंबईपेक्षा नवी मुंबईतील तापमान कमीत कमी दोन ते चार अंश सेल्सिअसने जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे.या शहराची निर्मिती करताना सिडकोने कमी निसर्गसंपदा निर्माण केल्याने ही काहिली अधिक वाढू लागली आहे. सिडकोनंतर शहराचे पालकत्व स्वीकारलेल्या पालिकेनेही हा प्रश्न अद्याप गांभीर्याने घेतलेला नाही, असा अनेक पर्यावरण संस्थांचा अभिप्राय आहे. ठाणे खाडीकिनाऱ्यावरील मिठागरांच्या जमिनींवर मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेल्या नवी मुंबईच्या जमिनीवर आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सात बेटांवर वसलेल्या मुंबईपेक्षा नवी मुंबईतील दुपारच्या वेळचे तापमान चार अंश सेल्सिअसने जास्त असते, असे बेलापूर येथील रहिवासी, पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. महामुंबई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. नवी मुंबई विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले असून उलवा टेकडीची उंची आठ मीटरपर्यंत कमी करण्यात आली आहे. विमानतळाच्या धावपट्टीसाठी एक हजार हेक्टर क्षेत्रात सपाटीकरण करण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी टन क्युबिक टन मातीचा भराव टाकण्यात आला. जेएनपीटी विस्तारासाठीही खारफुटी बुजवून सपाटीकरण करण्यात आले आहे. ठाणे-बेलापूर, शीव-पनवेल आणि नवी मुंबई-उरण महामार्गाचे सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात आले. या सगळ्याचा परिणाम म्हणून तापमान पूर्वीपेक्षा वाढले आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

महामुंबईत असलेली वृक्षसंपदा नष्ट होऊन त्या ठिकाणी सिमेंटचे जंगल तयार झाले. वातावरणात कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिमाण उष्णतेबरोबरच मानवी शरीरावर होऊ लागला आहे.-बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष, पर्यावरण सेवाभावी संस्था

आरोग्य धोक्यात

सायंकाळी आणि रात्रीदेखील हवा गरम असते. त्यामुळे यंदाचा उकाडा नवी मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. ताप, घसादुखी, पोटदुखीचा त्रास होणारे रुग्ण वाढल्याचे खासगी, तसेच पालिकेचे डॉक्टर सांगत आहेत.

काय काळजी घ्यावी?

दुपारी उन्हात फिरताना डोके झाकून घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये, म्हणून थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिणे गरजेचे आहे. लिंबू, साखरपाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते. उन्हाळ्यात थंड पेय, आइसक्रीम, बर्फाचा गोळा अशा पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढते. या पदार्थांमुळे तात्पुरते बरे वाटते; पण याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो. अतिथंड पदार्थांच्या सेवनामुळे घसा बसणे, खोकला होणे, असेही त्रास होत आहेत. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी, पोट बिघडण्याच्या तक्रारी वाढत आहेत. तहान जास्त लागली असली, तरीही पाणी पिताना काळजी घ्यायला हवी. घरातील स्वच्छ पाणी प्यावे, असा सल्ला डॉ. प्रतिक तांबे यांनी दिला.

कडक उन्हात बाहेर फिरताय? काळजी घ्या! उष्मासोबतच या आजारांचाही धोका वाढला, जाणून घ्या लक्षणं
मिनरल वॉटरला मागणी

उन्हात अनेक जण आरोग्यांची काळजी घेताना मिनरल वॉटर विकत घेतात. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या पाणपोईंच्या ठिकाणी पाण्यासाठी असणारी फिल्टर मशिन किंवा थंड पाणी मिळत नसल्यामुळे अनेक जण मिनरल वॉटर घेऊन आपली तहान भागवत आहेत. त्यामुळे मिनरल वॉटरला मोठी मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed