पंकज महाले याची नाचनखेडा गावात शेती असून तो एकटा १० एकर बागायती शेतीचा मालक आहे. त्याचे बीएस्सी ॲग्रीचे उच्च शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, नोकरी नसल्याने पंकज हा बेरोजगार आहे. १० एकर बागायती शेती असून सुद्धा केवळ नोकरी नसल्याने लग्नासाठी पंकजला लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. दिसायला सुंदर असतानाही फक्त शेतकरी अन् नोकरी नाही असं सांगितल की, मुलीकडच्यांचा नकार येतो. गेल्या काही वर्षांपासून पंकज लग्नासाठी मुलीचा शोध घेत आहे. मात्र, त्याला अपयशच मिळत असून विवाहयोग्य मुलगी मिळत नसल्याने पंकज हताश झाला आहे.
आपल्याप्रमाणे शेतकरी तसेच शेतीची कामे करणाऱ्या तरुणांचे विवाह होत नाहीत. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी पंकज महाले याने डोक्यावर टोपी, पांढरा गणवेश आणि कपाळी बाशिंग असा नवरदेवाचा पेहराव केला. पाचोरा शहरातील वर्दळीच्या मुख्य चौकात “बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे”! असा हातात फलक घेत, तो उंचावत, घोषणाबाजी करत अनोखे आंदोलन केलं. या आंदोलनाची संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चा रंगली असून या आंदोलनाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
उच्चशिक्षित आणि बागायतदार शेतकरी तरुणाने या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी मुलांचा आणि शेती असूनही केवळ नोकरी नसल्याने लग्न होत नसलेल्या तरुणांच्या बाजूने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातील तरुणांना लग्नाची फार मोठी आणि गंभीर समस्या भेडसावत असल्याचे पाहायला मिळतं. त्या सर्व तरुणांच्या बाजूने पंकज महाले केलेलं हे आंदोलन सर्व समाजाला विचार करायला लावणारे असेच आहे. पंकजा या आंदोलनामुळे शेतकरी कुटुंबातील मुलांना विवाहयोग्य मुली मिळाल्या तर पंकज याच्या आंदोलनाचा उद्देश नक्कीच सफल आणि सार्थकी लागेल यात शंकाच नाही.