सातारा जिल्हा बॅंकेच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी विविध तरतूदी करण्यासाठी बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी सभापती रामराजे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी रामराजे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
रामराजेंना दिल्लीला पाठवण्याची गरज आहे, त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढे हा विषय मांडून मान्य करुन घेतला जाईल, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फलटणमधील कार्यक्रमात नुकतेच जाहीर केले होते.
याबाबत रामराजेंना विचारले असता ते म्हणाले, पक्षाने आदेश दिला तर मी माढा लोकसभेसाठी लढण्यास तयार आहे. त्यासाठी खासदार शरद पवारांचा निर्णय अंतिम असेल. पण, माढाचा खासदार यावेळेस फलटणच्या वाड्यातीलच होणार आहे, असे उत्तर देत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अप्रत्यक्ष आव्हानच दिले.
दोन दिवसांपूर्वी रामराजे नाईक- निबाळकर यांच्या फलटण येथील अमृत महोत्सव सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी रामराजे यांनी दिल्लीत जावून नेतृत्व करायला हवं. दिल्लीतून कशी सातारा जिल्ह्याची अन महाराष्ट्राची परिस्थिती आहे, हे दिल्लीत अजून उंचावर गेल्यावर अधिक दिसेल. केंद्र सरकारकडून जे शिल्लक राहिलेले आहे, ते आणण्यासाठी त्यांनी देश पातळीवर जावूनच काम करावे, असे सांगत, एकप्रकारे माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराचच सूतोवाच केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला आता तोंड फुटले आहे. हाच धागा पकडत आज पत्रकारांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर याबाबत रामराजे यांना विचारले असता त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करत मत व्यक्त केले.