आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ILFS च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. ILFS प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते. येत्या सोमवारी जयंत पाटील यांची ई़डीकडून चौकशी होणार आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी आतापर्यंत ईडीची कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसनंतर काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनी यापूर्वी केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीला सामोरे गेले होते. आता जयंत पाटील हे ईडीच्या नोटीसनंतर सविस्तरपणे काय भूमिका मांडतात, हे पाहावं लागणार आहे. जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस आणि सत्तासंघर्षाचा निकाल हा योगायोग असावा, असं उदय सामंत म्हणाले.