नाशिक : समृद्धीमागचं विघ्न हटायला काही केल्या तयार नाहीये. महामार्गावर दररोज कुठे ना अपघात होतात. त्यात आता पुलाचं काम सुरु असतानाच पुल कोसळल्याचं वृत्त आहे. सिन्नर ते घोटीदरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गाचा पूल अचानक कोसळला. या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरु होते. मात्र काम सुरु असतानाच सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेला पूल कोसळल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी दरम्यानचा मार्ग प्रवासांसाठी खुला झाला आहे.आता सिन्नरपासून ते मुंबईपर्यंत या महामार्गाचे काम सुरु आहे. उद्घाटनापासून हा महामार्ग अपघातांमुळे चर्चेत आहे. असे असताना पुलाचे बांधकाम सुरू असतानाच समृद्धी महामार्गावरील ब्रिज कोसळला. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या बांधकामावरच नागरिकांकडून शंका उपस्थित होऊ लागली आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर घोटी ते सिन्नर दरम्यान गांगडवाडी पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण होण्याच्या आधीच पुल कोसळला. पुल वाहतुकीसाठी सुरु होण्यापूर्वीच कोसळल्याने समृद्धी महामार्गावरील कामासंदर्भात शंका निर्माण होऊन बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास पुल कोसळताना मोठा आवाज झाल्याने जवळपासच्या गावांपर्यंत त्याचा आवाज गेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.समृद्धी महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होते. अद्याप काम पूर्ण झालेले नसताना महामार्गावरील पुलाचे काम प्रगतीपथावर आले होते. याच दरम्यान पुल कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातांची संख्या देखील अधिक असल्याने महामार्गावरील अपघात चिंतेचा विषय ठरलेला असतानाच आता तेथील बांधकामासंदर्भात देखील चिंता निर्माण झाली आहे.