• Sat. Sep 21st, 2024

आईच्या उपचारासाठी पैशांची गरज, हातपाय बांधूनही डॉक्टरांची चुळबुळ, केअरटेकरने सगळं सांगितलं

आईच्या उपचारासाठी पैशांची गरज, हातपाय बांधूनही डॉक्टरांची चुळबुळ, केअरटेकरने सगळं सांगितलं

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: सांताक्रूझ येथील वृद्ध डॉक्टर मुरलीधर नाईक (वय ८५) यांच्या हत्येचा गुन्हा पोलिसांनी केवळ १२ तासांत उघडकीस आणला. हत्येनंतर पळालेला केअर टेकर कृष्णा मानबहाद्दूर परिहार (३०) याला अहमदाबाद येथून अटक केली. कृष्णा याने हत्या केल्यानंतर नाईक यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढली आणि पसार झाला होता.

सांताक्रूझ पश्चिमेला हेलेना बिल्डिंगमध्ये डॉ. मुरलीधर नाईक हे पत्नीसह वास्तव्यास होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून, सर्व मुले इतरत्र राहत असल्याने आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी केअर टेकरला ठेवले होते. अनेक महिन्यांपासून काम करणाऱ्या केअर टेकरचे लग्न असल्याने त्याने नोकरी सोडली. त्यामुळे हेल्थ केअर ऍट होम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपीनीच्या मार्फतने १ मे पासून कृष्णा याला केअर टेकर म्हणून नाईक यांच्याकडे पाठविण्यात आले. सोमवारी सकाळी डॉ. नाईक यांची खोलीतच हत्या करून कृष्णाने पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून झाडाझडती घेतली असता नाईक यांच्या गळ्यातील सोन्याची चेन गायब होती. यावरून कृष्णाने लुटीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

नाईक डॉक्टरांच्या गळ्यातील रुद्राक्षाच्या माळेची भुरळ पडली, सांताक्रुझमध्ये केअरटेकरने ८५ वर्षीय वृद्धाला संपवलं

सांताक्रूझ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून कृष्णा याचा शोध सुरू केला. सांताक्रूझ पोलिस ठाण्यासह याच परिसरातील वेगवेगळ्या पोलिस अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली. कंपनीकडून कृष्णा याचा मोबाइल क्रमांक मिळाला. मात्र, त्याने हत्येनंतर मोबाइल बंद केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग घेतला असता, तो बोरिवली स्थानकातून सौराष्ट्र मेल पकडून गुजरातच्या दिशेने जात असल्याचे समजले. पोलिसांनी यासाठी रेल्वे पोलिसांची मदत घेतली आणि त्यांना कृष्णाबाबत माहिती दिली. कृष्णा अहमदाबाद येथे पोहोचताच त्याला ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांनी अहमदाबाद गाठत कृष्णाचा ताबा घेतला.

आईच्या उपचारासाठी चोरी

कृष्णा हा मूळचा नेपाळचा असून तिकडे त्याची पत्नी आणि आई वास्तव्यास आहे. आईला गंभीर आजाराने ग्रासले होते आणि तिच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने सोन्याची चेन चोरली. हातपाय बांधले आणि तोंडाला चिकटपट्टी लावूनही नाईक यांची चुळबुळ तसेच आवाज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने कृष्णा याने त्यांचा गळा दाबला आणि पळ काढल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed